मुंबई Mumbai Dabbawala :लाखो मुंबईकरांच्या पोटाची भूक वेळेवर भागवणाऱ्या मुंबईतील डबेवाल्यांची कीर्ती (Mumbaicha Dabewala Story) ही आता लवकरच केरळमध्ये घराघरांमध्ये पोहचणार आहे. मुंबईतील डबेवाल्यांची (Dabbawala) माहिती ही केरळच्या शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा निर्णय केरळ सरकारनं घेतला आहे. इयत्ता नववीच्या इंग्रजी अभ्यासक्रमात डबेवाल्यांच्या गोष्टीचा समावेश करण्यात आला आहे. "द सागा ऑफ द टिफिन कॅरियर" या नावाचा हा धडा ह्युग आणि कॉलिन ग्याटझर यांनी लिहिलेला आहे.
सातासमुद्रापार कौतुक : 130 वर्षाहून अधिक जुना असलेल्या डबेवाल्यांच्या व्यवसायाला 1890 मध्ये सुरुवात झाली. तेव्हापासून मुंबईचे हे डबेवाले मुंबईतील ऑफिस कर्मचाऱ्यांना वेळेवर जेवणाचे डबे पोहोचवण्याचं काम सतत करत आले आहेत. मुंबईमध्ये पाच हजाराहून अधिक डबेवाल्यांची संख्या असून ते दररोज दोन लाखाहून अधिक डबे पोहोचवण्याचं काम करतात. डबेवाल्यांच्या व्यवस्थापनाचं आणि वितरण प्रणालीचं कौतुक फक्त देशातच होत नाही तर ते साता समुद्रापारही केलं जातंय. पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा, डोक्यावर गांधी टोपी आणि पायात कोल्हापुरी चप्पल असा त्यांचा विशेष गणवेश हा सुद्धा लोकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. मुंबईच्या डबेवाल्यांची ख्याती देश विदेशात पसरलेली आहे.
डबेवाल्यांचं जीवनमान ते व्यवस्थापन : केरळ स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने (एससीईआरटी) 2024 च्या नवीन अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून डबेवाल्यांच्या प्रेरणादायी गोष्टीचा समावेश त्यात केला आहे. यामध्ये डबेवाल्यांचा पूर्ण इतिहास, त्यांचा पोशाख, त्यांची सेवा, त्यांचं व्यवस्थापन आणि वितरण प्रणाली यावर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. डबेवाल्यांचं पूर्ण व्यवस्थापन त्यांचं जीवन राहणीमान यावर या धड्यामध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. याबाबत बोलताना डबेवाला संघटनेचे प्रवक्ते, विष्णू काळडुके म्हणाले की, केरळ सारख्या राज्याने आमची दखल घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभारी आहोत. आम्हाला प्रसिद्धीची काही कमी नाही. परंतु आमचं व्यवस्थापन आमची प्रणाली याची माहिती सर्वदूर पसरावी ही आमची मनापासून इच्छा आहे.