मुंबई Mumbai Crime News :मुंबईतील वरळी येथे एका 24 वर्षीय तरुणीला नोकरीचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी वरळी पोलिसांनी 50 वर्षीय आरोपी जोसेफ जेम्स झेवियर्सला अटक केल्याची माहिती वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र काटकर यांनी दिली.
नेमकं काय घडलं? : वरळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील रहिवासी असलेल्या पीडित तरुणीनं नोकरीसाठी एका पुरुष मित्राची मदत घेतली. पीडितेला मैत्रिणीनं जोसेफचा मोबाईल नंबर दिला. नोकरीसाठी त्याच्याशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. यानंतर पीडिताच्या मित्रानं तिला आरोपी जोसेफने खार येथे भेटायला बोलावलंय, असं सांगितलं. पीडिता ताबडतोब टॅक्सीनं खारला पोहोचली. तिथं जोसेफ आणि तिचा मित्र होते. यानंतर तिघेही एका हॉटेलमध्ये गेले. मद्यपान करून मध्यरात्रीच्या सुमारास घराकडे निघाले होते. तरुणीचे मित्र निघून गेल्यानंतर ती एकटीच खार स्थानकाच्या दिशेनं चालली होती.
विरोध केला असता मारहाण- दुचाकीवरून निघालेल्या जोसेफनं तिला थांबवलं. दुचाकीवर तुला सोडतो असं सांगितलं. त्यानंतर दोघंही दुचाकीवरुन वरळी परिसरात आले. या ठिकाणी एका पार्किंग केलेल्या कारमध्ये जोसेफनं तिच्यावर बलात्कार केल्याचं तरुणीनं तक्रारीत म्हटलंय. दारूच्या नशेत असल्याचा गैरफायदा घेत जोसेफनं तिच्यावर बलात्कार केला. विरोध केला असता त्यानं मारहाण केल्याचं देखील पीडित तरुणीनं सांगितलं.