मुंबई Mumbai Crime : बनावट नोटा छापून चलनात आणणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या कक्ष 10 नं (Crime Branch 10) पर्दाफाश केला. रत्नागिरीतील प्रसाद राणे प्रिंटिंग प्रेसमध्ये या बनावट नोटांची छपाई सुरु असल्याच्या माहितीवरून कारवाई करत, गुन्हे शाखेनं आरोपींना बेड्या ठोकल्या. या प्रकरणात प्रिंटिंग प्रेसच्या मालकाला अटक केली असून ही आतापर्यंतची सातवी अटक आहे.
नेमकं प्रकरण काय :भारतीय चलनातील बनावट नोटा वितरीत करण्यासाठी मानखुर्द उड्डाण पुलाजवळ असलेल्या शहानवाज शिरलकर, राजेंद्र खेतले, संदीप निवलकर आणि ऋषीकेश निवलकर यांना गुन्हे शाखेच्या कक्ष 10 चे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक सावंत यांच्या नेतृत्वातील पथकानं बनावट नोटांसह रंगेहात अटक केली. आरोपींची चौकशी केली असता, चिपळून नागरी पतसंस्थेच्या शाखा व्यवस्थापक अमित कासार यानं या बनावट नोटा दिल्याचं उघडकीस आलं.
गुन्हे शाखेनं कासार याला गजाआड करत केलेल्या चौकशीत एका वकिलाचाही गुन्ह्यातील सहभाग समोर आला. त्यानुसार, गुन्हे शाखेनं वकिलाला अटक केली. बनावट नोटांची छपाई रत्नागिरीतील प्रसाद राणे प्रिंटिंग प्रेसमध्ये करण्यात आल्याचं उघड होताच गुन्हे शाखेनं राणेला ताब्यात घेत बेड्या ठोकल्या आहेत. राणे याच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये छापलेल्या बनावट नोटा कासार यानं पतसंस्थेच्या माध्यमातून वापरल्या आहेत का, याचा गुन्हेशाखा शोध घेत आहे.
बनावट नोटांप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं कारवाई करण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळताच राणे यानं बनावट नोटांची छपाई केलेले प्रिंटिंग मशीन घरापासून काही अंतरावर असलेल्या झुडपात फेकली. गुन्हे शाखेनं ही मशीन जप्त केली आहे. न्यायालयानं आरोपी राणे याला ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून गुन्हे शाखेचे अधिकारी त्याच्याकडं कसून चौकशी करत आहेत.
हेही वाचा
- बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, 1 लाख 90 हजाराच्या नोटांसह 3 लाखांचा मुद्देमाल जप्त - Fake currency notes factory busted
- लोकसभा निवडणुकीनंतर नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात बनावट नोटा आढळल्याने खळबळ - Fake Currency Nandurbar
- बुलडाण्यात आढळले बनावट नोटा छापण्याचे मशीन? मलकापूर पोलिसांनी प्रिंटिंग मशिन्स केल्या जप्त