महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई पोलिसांनी कुख्यात ड्रग्ज तस्करांना ठोकल्या बेड्या, 11 तस्कराकडून 2 कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त - ड्रग्ज तस्करांना ठोकल्या बेड्या

Mumbai Crime : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकानं टाकलेल्या छाप्यात 11 ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आलं आहे. या तस्करांकडून दोन कोटींच ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Mumbai Crime
कुख्यात ड्रग्ज तस्करांना ठोकल्या बेड्या

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 30, 2024, 7:32 AM IST

मुंबई Mumbai Crime : पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षानं टाकलेल्या छाप्यात अकरा तस्करांना पकडण्यात यश आलं आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्यांमध्ये कुख्यात ड्रग्ज तस्कर फारुख बटाटा याचा मुलगा आहे. तो मुंबईतील प्राथमिक ड्रग्ज पुरवठा नेटवर्कचा प्रमुख असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनात घाटकोपर इथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक लता सुतार यांच्या नेतृत्वाखाली अमली विरोधी पथकानं ही अटक केली आहे.

अकरा तस्करांना ठोकल्या बेड्या :मुंबईमध्ये विविध ठिकाणी छापेमारी करून अमली पदार्थ विरोधी पथकानं अकरा तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत 2 कोटी 22 लाखांचं ड्रग्ज जप्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे. अमली पदार्थ विरोधी पथकानं मुंबईच्या विविध भागात टाकलेल्या छाप्यांमध्ये 1 किलो 110 ग्रॅम वजनाचं आणि 2.22 कोटी रुपये किमतीच्या एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे.

कुख्यात ड्रग्ज सप्लायरला ठोकल्या बेड्या :पोलिसांनी या प्रकरणातील वाँटेड कुख्यात ड्रग्ज सप्लायर सैफुल्ला फारूख शेख उर्फ फैफ बटाटा यालाही यशस्वीरित्या पकडलं. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या प्रकरणाची पाळंमुळं 2021 मध्ये अमली पदार्थ विरोधी पथकानं जोगेश्वरी इथं केलेल्या ड्रग्जशी संबंधित कारवाईशी जोडलेले आहेत. त्यानंतरच्या तपासात फारुख बटाटा याचा अमली पदार्थांच्या तस्करीतील सहभाग उघड झाला. त्यावेळी बटाटा विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. मात्र, अलीकडं अटक होईपर्यंत बटाटा हा वॉन्टेड आरोपी होता.

बटाटा विकणारा बनला ड्रग्ज तस्कर :जोगेश्वरी परिसरात 1989 ते 2000 या काळात बटाटे विकण्यासाठी ओळखला जाणारा फारुख बटाटा यानं सुमारे दशकभरापूर्वी अमली पदार्थांच्या तस्करीत मोठी संपत्ती जमा केल्याची माहिती सूत्रानं दिली आहे. अलीकडंच अटक करण्यात आलेला सैफुल्ला फारूख शेख याच्यासह बटाटा याचे तीन मुलं अमली पदार्थांच्या अवैध व्यापारात सहभागी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उल्लेखनीय म्हणजे चार वेळा लग्न केलेल्या फारुख बटाटा याला सैफुल्ला फारूख शेख, सलमान आणि शादाब बटाटा अशी तीन मुलं आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सैफुल्ला याच्याकडं विशेषत: वांद्रे ते मीरा रोडपर्यंत ड्रग्ज पुरवठ्याचं कंत्राट आहे. ड्रग्जचं जाळं उद्ध्वस्त करण्यासाठी आणि शहरातील बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती यावेळी पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. कांदिवलीत घरातच सुरू होता एमडी ड्रग्जचा कारखाना, एक कोटी 17 लाख 60 हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
  2. मुंबईत नऊ कोटी रुपयांचं कोकेन जप्त, नायजेरियाच्या दोघांना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details