मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची निर्मल नगर इथं 12 ऑक्टोबरला निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तीन मारेकऱ्यांना अटक केली आहे. या मारेकऱ्यांकडून पोलिसांना बाबा सिद्दीकी प्रकरणातील महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. पोलिसांनी मारेकऱ्यांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केलेल्या तीन पिस्तूल जप्त केल्या आहेत. यात ऑस्ट्रेलियन बनावटीची ग्लॉक पिस्तूल, टर्कीश पिस्तूल आणि एक देशी बनावटीची पिस्तूल असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी वृत्तसंस्थेला दिली आहे.
बाबा सिद्दीकीहत्या प्रकरणात वापरली अत्याधुनिक शस्त्र :राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यासाठी मारेकऱ्यांनी अत्याधुनिक शस्त्रांचा वापर केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. मुंबई पोलिसांनी मारेकऱ्यांकडून तीन पिस्तूल जप्त केले आहेत. यात ऑस्ट्रेलियन ग्लॉक या अत्याधुनिक पिस्तूलसह टर्कीच्या जिगाना पिस्तूलचा समावेश आहे. मारेकऱ्यांनी एक देशी बनावटीची पिस्तूलही बाबा सिद्दीकी यांची हत्या करताना वापरली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी वृत्तसंस्थेला दिली आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यासाठी मारेकऱ्यांनी तीन पिस्तूलचा वापर केल्याचं मुंबई पोलिसांनी वृत्तसंस्थेला सांगितलं.