मुंबई Mumbai Police Rescue Kidnapped Man : पैशाच्या वादातून अपहरण करण्यात आलेल्या 30 वर्षीय तरुणाची पोलिसांनी 12 तासात पुण्यातून सुटका केली. ही घटना शनिवारी मध्यरात्री लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. हेमंतकुमार रावल असं अपहरण करण्यात आलेल्या तरुमाचं नाव आहे. त्याला अज्ञात आरोपींनी मारहाण करत कारमधून अपहरण केलं होतं. त्यानंतर 12 तासात पुणे येथील कोंढवा परिसरातून अपहृत हेमंतकुमार रावल याची लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी सुखरुप सुटका केल्याची माहिती लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ यांनी दिली आहे. कपुराम घांची आणि प्रकाश पवार, गणेश पात्रा असं अपहरण करणाऱ्या आरोपींची नावं आहेत.
पैशाच्या वादातून केलं अपहरण :कपुराम घांची, प्रकाश पवार, गणेश पात्रा हे तिघं आरोपी असून या तिघांविरुद्ध लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 140 (3), 115 (2), 61 (2) 189 (2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कपुराम घांची यांनी हेमंतकुमार रावल सोबत टेक्स्टाईलचा व्यवसाय सुरु केला. घांची हे अहमदाबादहून आणलेल्या कपड्यांचा माल हेमंतकुमार रावल याला पुरवत होते. रावल पुण्यात तो सप्लाय करत होता. मात्र, रावल यानं या टेक्स्टाईलच्या मालाचे 30 लाख रुपये घांची यांना बरेच महिने झाले दिले नसल्यानं कपूराम घांची यानं रावल याचं अपहरण करण्याचा कट रचला.
मद्यपान करताना मारहाण करुन केलं अपहरण :चिराबाजार इथं 21 जुलैला रात्री 2:05 वाजता मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून याबाबत संदेश प्राप्त झाला. चिराबाजार याठिकाणी एका तरुणास चार आरोपींनी मारहाण केली आहे. त्या तरुणाचं अपहरण करुन त्याला कारमधून घेऊन गेले आहेत. प्राप्त झालेल्या संदेशावरुन हेमंतकुमार रावल याचा मित्र प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कार्तिक सिंग राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरुन लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी 12 तासात मोठ्या शिताफीनं ठोकल्या आरोपींना बेड्या :पोलिसांनी गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून पथक तयार केलं. लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक घाडीगांवकर, सहायक पोलीस निरीक्षक भंडारे, पोलीस उपनिरीक्षक कांबळे तसेच डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पाटील आणि पायधुनी पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक वायाळ असं पथक तयार करुन अपहरण केलेल्या व्यक्तीचा आणि आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. तांत्रिक तपासावरून सहायक पोलीस निरीक्षक भंडारे, सहायक पोलीस निरीक्षक पाटील आणि गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी आरोपींनी वापरलेल्या वाहनाचा माग काढत त्यांच्या कोंढवा, पुणे येथील पत्त्यावर पोलीस पथक पोहचलं. कोंढवा या ठिकाणी त्यांनी अतिशय कौशल्यानं तपास करुन 12 तासाच्या आत गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह 3 आरोपींना अटक केलं. पोलिसांनी हेमंतकुमार रावल याची सुखरूप सुटका केली. या गुन्ह्यात तपासादरम्यान आणखी 3 आरोपींचा सहभाग निष्पन्न झालेला असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा :
- विद्यार्थीनीचं रस्त्यावरुन रिक्षातून अपहरण करत ॲसिड हल्ल्याची धमकी; तरुण फरार - Thane Crime News
- अल्पवयीन मुलीचं अपहरण करून लैंगिक अत्याचार; नराधमाला आठ वर्षांनंतर २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा - Convict in rape gets 20 years
- बाळ चोरी प्रकरणाचा काही तासात उलगडा; अपहरणकर्तीनं घटनेमागं सांगितलं 'हे' कारण - Child Kidnapping Case Nagpur