महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आईला घरी श्वान पाळायची हौस, मुलानं सोनसाखळी हिसकावून पूर्ण केली मातेची इच्छा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Chain Snatcher Arrested

Chain Snatcher Arrested : आईला घरी श्वान पाळायची असलेली हौस पूर्ण करण्यासाठी मुलानं सोनसाखळी चोरल्याची धक्कादायक घटना घाटकोपरला उघडकीस आली. विनायक शेळके असं या सोनसाखळी चोराचं नाव आहे.

Chain Snatcher Arrested
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 9, 2024, 7:11 AM IST

मुंबई Chain Snatcher Arrested : आईची श्वान पाळायची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलानं चक्क सोनसाखळी चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घाटकोपर पश्चिम इथं ही घटना घडली असून घाटकोपर पोलीस ठाण्यात या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 309 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक शेळके (वय 21 ) असं आईची श्वान पाळण्याची हौस पुरवण्यासाठी सोनसाखळी चोरणाऱ्या तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी विनायकला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती घाटकोपर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक दिपाली कुलकर्णी यांनी दिली आहे.

आईला घरात श्वान पाळण्याची आवड :आईला घरात श्वान पाळण्याची आवड असल्यानं आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलानं चक्क एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली. या सोनसाखळीच्या पैशातून आईसाठी त्यानं श्वानाचं पिल्लू खरेदी करुन आणल्याची धक्कादायक घटना घाटकोपर पश्चिम इथं उघडकीस आली. सोनसाखळी चोरली म्हणून आरोपी विनायक शेळके याला घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे.

हॉटेल मॅनेजमेंटमध्ये उच्चशिक्षित आहे विनायक :घाटकोपर पश्चिम इथल्या एका चाळीत आई वडील आणि लहान भावासह आरोपी विनायक शेळके राहण्यास आहे. आरोपी विनायकचं वडील खासगी वाहनावर वाहनचालक म्हणून काम करतात. तसेच आरोपी विनायक यानं हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला आहे. एका हॉटेलमध्ये बार टेंडर म्हणून तो नोकरी करतो.

सोनसाखळी चोरुन आईची इच्छा केली पूर्ण :आरोपी विनायकच्या आईच्या मैत्रिणीच्या घरी 'सिह्टझु' जातीच्या श्वानाचं पिल्लू आहे. तसं पिल्लू स्वतःच्या घरी असावं अशी विनायकच्या आईची देखील इच्छा होती. अनेकदा आईनं ती इच्छा विनायककडं बोलून दाखवली. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यानं सिह्टझु जातीच्या श्वानांच्या पिल्लाची किंमत विचारली. मात्र, किंमत आवाक्याबाहेर असल्यामुळे एवढी रक्कम कुठून आणावी, म्हणून विचारात विनायक होता. त्यानं गेल्या आठवड्यात घाटकोपर पश्चिम भटवाडी इथल्या गणेश मंदिराजवळ एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळ काढला. चोरीची सोनसाखळी विकून त्यानं आईसाठी सिह्टझु जातीच्या श्वानाचं पिल्लू 20 हजार रुपयांना खरेदी करुन ते पिल्लू आईला भेट दिलं आणि आईची इच्छा पूर्ण केली.

सीसीटीव्हीतील फुटेजवरुन पोलिसांनी काढला माग :घाटकोपर पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक दिपाली कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कैलास तिरमारे, पोलीस उपनिरीक्षक पद्माकर पाटील तसेच कोयंडे, देवार्डे, कंक आणि पथकानं तत्काळ तपासाची चक्रं फिरवली. या पथकानं घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. तसेच 55 ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्यातून मिळालेल्या ब्लर फुटेजवरुन खबऱ्यांना कामाला लावलं. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी विनायक शेळके याला राहत्या घरातून अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडं केलेल्या चौकशीत विनायकनं सोनसाखळी चोरी करण्याचं कारण पोलिसांना सांगितलं. मात्र विनायक खोटं बोलत असावा म्हणून पोलिसांनी खात्री केली. यावेळी विनायकच्या घरी खरोखर श्वान आणला होता. घाटकोपर पोलिसांनी विनायकला चोरीच्या गुन्ह्यात अटक करुन त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

हेही वाचा :

  1. Chain Snatcher Arrested: प्रेयसीचे महागडे हट्ट पुरवण्यासाठी प्रियकर बनला सोनसाखळी चोर...
  2. Chain Snatcher Arrested: उच्चशिक्षित चोरटे करायचे 'चेन स्नॅचिंग'; जळगावातील सराफाला विकायचे माल.. आरोपी अटकेत
  3. Mumbai Crime सराईत चोराला मुंबई पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडले, घटना सीसीटीव्हीत कैद

ABOUT THE AUTHOR

...view details