महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई कोस्टल रोड प्रकल्प, मुंबईकरांचे वैभव - MUMBAI COASTAL ROAD PROJECT

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वकांक्षा प्रकल्पांपैकी एक असलेला धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज समुद्र किनारी रस्ता म्हणजेच 'कोस्टल रोड' मुंबईकरांच्या सेवेसाठी खुला झाला आहे.

Mumbai Coastal Road Project
कोल्टल रोड (बृहन्मुंबई महानगरपालिका)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 27, 2025, 10:51 PM IST

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वकांक्षा प्रकल्पांपैकी एक असलेला धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज समुद्र किनारी रस्ता म्हणजेच कोस्टल रोड आता मुंबईकरांच्या सेवेसाठी खुला झाला आहे. याचे 94 टक्के काम पूर्ण झालेले असून, उर्वरित काम फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होणार आहे. हा रस्ता फेब्रुवारी महिना अखेरपर्यंत पूर्णपणे पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. या रस्त्याचे वैशिष्ट्य म्हणजे या कोस्टल रोड प्रकल्पामुळे मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ हा कमी होणार असून, इंधनात देखील बचत होणार आहे. मरीन ड्राईव्ह पासून सुरू होणारा रस्ता थेट विरार पर्यंत जोडण्याचा पालिकेचा निर्धार आहे. कसा आहे हा कोस्टल रोड प्रकल्प? चला सुरुवातीपासून समजून घेऊयात.


सन 2017-18 मध्ये कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. त्यावेळी युती सरकार होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. तर, त्यांना पूर्वीच्या विभक्त न झालेल्या शिवसेनेची साथ होती. हा प्रकल्प म्हणजे ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असं त्यावेळी म्हटलं जात होतं. या रस्त्याच्या कामासाठी 7 वर्षांहून अधिकचा काळ लागला असून, या रस्त्याच्या कामाच्या सुरुवातीला मरीन ड्राईव्ह ते वरळी या भागात मोठ्या प्रमाणात बॅरिकेटिंग करण्यात आले होते. त्यामुळे मुंबईकरांना त्याचा खूप त्रास होता. आता कोस्टल रोड प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईकरांचा प्रवास सुसाट होत आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी दोन किलोमीटरचे दोन बोगदे देखील असून, या बोगद्याच्या कामासाठी देशातील सर्वात मोठे टनेल बोरिंग मशीन मावळा वापरण्यात आले होते.

मावळा देशातील सर्वात मोठे टनल बोरिंग मशीन (बृहन्मुंबई महानगरपालिका)


मावळा मशीन :

1) मावळा देशातील सर्वात मोठे टनल बोरिंग मशीन

2) मशीन चार माळ्यांच्या इमारती इतके उंच

3) भारतातील सर्वात मोठे डायमीटर चे मशीन

कोल्टल रोड (बृहन्मुंबई महानगरपालिका)


मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाण पुलापासून ते वरळी पर्यंत 2.7 किलोमीटरचे दोन जुळे बोगदे तयार करण्यात आले आहेत. या बोगद्यांच्या कामासाठी मावळा या देशातील सर्वात मोठे टनल बोरिंग मशीनचा वापर करण्यात आला. हे मशीन चार माळ्यांच्या इमारती इतके उंच असून, या मशीनच्या सहाय्याने हे भूमिगत बोगदे तयार करण्यात आले आहेत. मावळा हे मशीन भारतातील सर्वात मोठे डायमीटरचे मशीन असून, देशात पहिल्यांदाच सॅकार्डो व्हेंटिलेशन सिस्टीम असलेला बोगदा या कोस्टल रोड मार्गावर बनवण्यात आला आहे. या काही गोष्टी कोस्टल रोड प्रकल्पाला आणखी खास बनवतात.



भूमिगत बोगदा :

1) 2.7 किलोमीटरचे दोन जुळे बोगदे

2) देशात पहिल्यांदाच सॅकार्डो व्हेंटिलेशन सिस्टीम असलेला बोगदा

3) प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाण पुलापासून ते वरळी भूमिगत बोगदा

26 जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोस्टल रोड ते वांद्रे वरळी सी लिंकला जोडणाऱ्या मार्गाचे लोकार्पण करण्यात आले. या मार्गावर एक महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे एक गर्डर. वांद्रे-मरीन ड्रेनच्या दोन टोकांना जोडणारा पहिला गर्डर 25 एप्रिल 2024 रोजी पहाटे 4 वाजता माझगाव डॉक येथून कोस्टल रोड साइटवर पोहोचला. कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणाऱ्या गर्डरवर सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. गर्डरला गंजण्यापासून वाचवण्यासाठी C-5 जपानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या गर्डरचे वजन 2,000 मेट्रिक टन असून, 136 मीटर लांब आणि 18 ते 21 मीटर रुंद आहे. या गर्डरचे छोटे सुटे भाग हरियाणा येथील अंबाला येथे तयार केले आहेत. सुमारे 500 ट्रेलरच्या मदतीने हे सुटे भाग मुंबईत पोहोचले. सुटे भाग एकत्र करून नवी मुंबईतील न्हावा बंदरातून ताफ्याच्या मदतीने वरळीत आणण्यात आले.

गर्डर (बृहन्मुंबई महानगरपालिका)



गर्डर :


1) गर्डर गंजण्यापासून वाचवण्यासाठी C-5 जपानी तंत्रज्ञानाचा वापर

2) गर्डरचे वजन 2,000 मेट्रिक टन

3) गर्डर 136 मीटर लांब आणि 18 ते 21 मीटर रुंद

4) हरियाणा अंबाला येथे सुटे भाग तयार केले

5) 500 टेलरच्या मदतीने गर्डरचे सुटे भाग मुंबईत

पालिकेचा कोस्टल रोड प्रकल्प दक्षिण मुंबई ते उत्तर मुंबईला जोडणारा सर्वात महत्त्वाचा मार्ग ठरणार आहे. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा कोस्टल रोडचा पहिला टप्पा असून, यासाठी पालिकेला तब्बल 14 हजार कोटींचा खर्च आला आहे. 2017-18 रोजी सुरू झालेला हा प्रकल्प पालिकेच्या नियोजनानुसार 2023 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, कोविड काळात लागलेले लॉकडाऊन, ठप्प झालेली सर्व कामे त्यामुळे या प्रकल्पाचा नियोजित खर्च वाढला. या प्रकल्पाचा सुरुवातीचा नियोजित खर्च 8 हजार कोटी इतका होता. तो पुढे जाऊन प्रकल्पाचा पूर्ण होण्याचा काळ वाढल्याने 14 हजार कोटी इतका झाला.

कोस्टल रोड खर्च व प्रकल्प कालावधी :

1) सुरुवातीचा खर्च 8 हजार कोटी

2) वाढलेला खर्च 14 हजार कोटी

3) 2023 मध्ये प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित

4) 2024 अखेर प्रकल्प पूर्ण

गर्डर (बृहन्मुंबई महानगरपालिका)

पहिल्या टप्यातील रोड दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी खुला :पहिल्या टप्प्यातील 10.58 किमी लांबीचा कोस्टल रोड प्रकल्प दोन्ही बाजूंच्या वाहतुकीसाठी खुला झाला आहे. 27 जानेवारीपासून मुंबईकरांना मरीन ड्राइव्ह ते वांद्रे आणि वांद्रे ते मरीन ड्राइव्ह अवघ्या 15 मिनिटांत पोहोचता येणार आहे. मुंबई कोस्टल रोड दररोज सकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी खुला असेल. या प्रकल्पामुळे मुंबईकरांना वरळी-वांद्रे सी लिंक मार्गे पश्चिम द्रुतगती महामार्ग घेऊन मुंबईकरांना मरिन ड्राइव्ह ते दहिसरपर्यंत वीना सिग्नल मोफत प्रवास करता येणार आहे.


या पहिल्या टप्प्याची पहिली लेन मरीन ड्राईव्ह ते बिंदू माधव ठाकरे चौक वरळी इथपर्यंत होती. हा दक्षिण मार्ग असून ही पहिली लेन 9.29 किलोमीटरची आहे. पहिली लेन 11 मार्च 2024 रोजी सुरू करण्यात आली. लोटस जंक्शनपर्यंत मुंबईकरांसाठी खुली करण्यात आली. यानंतर हाजी ते खान अब्दुल गफार खान रोड अली ते वांद्रे-वरळी सी लिंक (तात्पुरते, 3.5 किमी) 11 जुलै 2024 रोजी कनेक्टिंग लेन उघडण्यात आली आहे. त्यानंतर वांद्रे वरून मरीन ड्राईव्ह कडे येणारी लेन 13 सप्टेंबर रोजी मुंबईकरांसाठी खुली करण्यात आली.

1967 सालीच प्रकल्पासाठी प्रयत्न सुरूवात :या प्रकल्पाची चर्चा सन 2017-18 मध्ये सुरू झाली असली तरी, या प्रकल्पासाठी सण 1967 मध्येच प्रयत्न सुरू झाले होते. त्यावेळी हा प्रकल्प एमएसआरडीसी करणार होते. त्यासाठी तब्बल 19 प्राधिकरणांची परवानगी आवश्यक होती. सोबतच न्यायालयाचे परवानगी देखील आवश्यक होती. पुढे सर्वोच्च न्यायालयाच्या ग्रीन सिग्नल नंतर 2018 मध्ये कोस्टल रोड प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. यात समुद्राच्या किनारी असलेला भूमिगत बोगदा तयार करणे हे पालिके समोरचे सर्वात मोठे आव्हान होते. ही सर्व आव्हाने पार करून हा कोस्टलर प्रकल्प आता मुंबईकरांसाठी खुला झाला आहे.

मुंबईकरांच्या वेळात आणि इंधनात बचत :विशेष म्हणजे हा प्रकल्प केवळ मरीन ड्राईव्ह ते वांद्रे पुरता मर्यादित नसून, पुढे विरार पर्यंत मुंबईकरांना विना सिग्नल प्रवास करता यावा यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. त्यातील मरीन ड्राइव ते वांद्रे हा पहिला टप्पा आहे. हा पहिला टप्पा आता पूर्ण क्षमतेने सुरू झाला आहे. याचा पुढचा टप्पा म्हणजे दुसरा टप्पा हा एमएसआरडीसी करणार असून, तो वांद्रे ते वर्सोवा असा असणार आहे. तर, वर्सोवापासून पुढे विरार पर्यंतचा कोस्टोल रोड प्रकल्प बृहन्मुंबई महानगरपालिका करणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांचा ट्राफिक मधील वेळ वाचणार असून, इंधनात देखील बचत होणार आहे. या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुंबईकरांना वरळी सी लिंक वगळता विना टोल व विना सिग्नल प्रवास करता येणार आहे.

हेही वाचा :

  1. कोस्टल रोडच्या उत्तर वाहिनीचं आज लोकार्पण, उद्यापासून मुंबईकरांना प्रवास करता येणार
  2. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अवघ्या 10 मिनिटांत, 'कोस्टल रोड' आजपासून प्रवासासाठी खुला - Mumbai Coastal Road
  3. सुसाट मुंबई...! कोस्टल रोडचा 'हा' मार्ग उद्यापासून मुंबईकरांच्या सेवेत - Coastal Road

ABOUT THE AUTHOR

...view details