मुंबई :राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. आजपासून सुरू झालेल्या या अधिवेशनात अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. यातच मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी अधिवेशनापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.
आदित्य ठाकरेंची चौकशी करा : मुंबईतील कोस्टल रोडचं बांधकाम करताना जमिनीवर कोणतेही निवासी, व्यावसायिक किंवा अन्य बांधकामं, अतिक्रमण करणार नाहीत, असं प्रतिज्ञापत्र सादर करणं आवश्यक होतं. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तसं प्रतिज्ञापत्र दिलं नव्हतं. यामागे नेमका काय हेतू होता. ही मोकळी जागा बिल्डरांना देण्यात आली होती का, त्या जागेवर बांधकाम करण्याचा उद्देश होता का, याची चौकशी व्हावी, अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.
तत्कालीन सरकारनं प्रतिज्ञापत्र दिलं नाही : “कोस्टल रोडच्या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन उद्धव ठाकरे सरकारच्या काळात पर्यावरण मंत्री असलेले आदित्य ठाकरे यांची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. याचं कारण केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं किनारपट्टीच्या रस्त्यांच्या मंजुरी मिळवताना घातलेल्या अटींमध्ये समुद्राच्या पाण्यामुळं निर्माण झालेल्या मोकळ्या जागांचं व्यापारीकरण होऊ नये, अशी अट घातली होती. मात्र, केंद्र सरकारला विनंती करूनही जागा रिक्त राहतील, असं प्रतिज्ञापत्र तत्कालीन सरकारनं केंद्र सरकारला दिलं नव्हतं".
300 एकर जागेचं सुशोभीकरण :माध्यमांशी संवाद साधताना आशिष शेलार म्हणाले, “मुंबईकरांना मुंबईत रिकाम्या जागा मिळू शकत नाहीत. मात्र, मुख्यमंत्री शिंदे तसंच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेमुळं मुंबईत जवळपास तीनशे एकर मोकळी जागा उपलब्ध झाली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. 300 एकर जागेचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यात कोणतंही व्यावसायिक बांधकाम केलं जाणार नाही. यामध्ये रेस कोर्स, कोस्टल रोडलगतच्या बिल्ट-अप एरियाचा समावेश आहे. त्या जागी सेंट्रल पार्कसारखं उद्यान तयार करण्यात येणार आहे.
'हे' वाचलंत का :
- महायुती आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा... - Maharashtra Politics
- पावसाळी अधिवेशन 2024 : देवेंद्र फडणवीसांसोबत लिफ्टमधून एकत्र प्रवास; उद्धव ठाकरेंनी विधानभवनात दाखवला 'ठाकरी बाणा' - Assembly Monsoon Session 2024
- NEET पेपर लीक प्रकरण : आरोपी जलील पठाणचा उदगीरात एक कोटीचा बंगला; दिव्यांग प्रमाणपत्रही बोगस? - NEET Paper Leak Case