बीड: कधी अतिवृष्टी तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करावा लागतो. अत्यंत कमी कालावधीत आणि कमी खर्चात उत्पादन घेण्यासाठी शेतकरी आपल्या शेतात विविध उपक्रम राबवत असतो. त्यामध्येच 'रेशीम शेती' हा देखील एक शेतीपूरक व्यवसाय म्हणून ओळखला जातो.
नोकरी सोडून केली रेशीम शेती :बीड जिल्ह्यात उद्योग, व्यवसाय नसल्यानं अनेक तरुण बेरोजगार आहेत. त्यामुळं सुशिक्षित बेरोजगारांचा जिल्हा म्हणून सुद्धा बीडकडं पाहिलं जातं. मात्र, बीडच्या गेवराई तालुक्यातील पाचेगावच्या एका कॉम्प्युटर इंजिनियर असलेल्या युवकानं नोकरी सोडत थेट शेती करण्याचा निर्णय घेतला. शेती करायची म्हटल्यावर कोणतं पिक घ्यावं हा महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न असतो. ज्या पिकांमधून कमी कालावधीत जास्त उत्पादन मिळेल अशी शेती केली पाहिजे. त्यामुळं रेशीम शेतीचा व्यवसाय निवडल्याचं कॅम्पुटर इंजिनियर असलेले मुकुंद राठोड यांनी सांगितलं.