पुणे Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : राज्य सरकारनं नुकतंच 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' जाहीर केली होती. या योजनेच्या माध्यमातून लाखो बहिणींच्या खात्यात दरमहा पंधराशे म्हणजेच दोन महिन्याचे एकदम तीन हजार रुपये पाठवण्यात आले होते. योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्यानंतर अनेक महिलांनी सरकारचे आभार देखील मानले. या योजनेचे जमा झालेले पैसे बँकांना कट करता येणार नाहीत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र, तरी देखील पुण्यात अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेले पैसे बँकेने कट केल्याचं समोर आलंय. यावेळी व्यथा मांडताना महिलेला रढू कोसळलं.
बँक खात्यातून पैसे कट : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या अंतर्गत शासनाच्या वतीनं एक कोटीहून अधिक महिलांना दोन महिन्यांचे तीन हजार रुपये खात्यात जमा केले आहेत. हे जमा झालेले पैसे आता बँक खात्यातून कट देखील व्हायला सुरुवात झाली. योजनेचे जमा झालेले पैसे बँकेनं कट केल्याचा आरोप पुण्यातील घोरपडे पेठ परिसरात राहणाऱ्या अनेक महिलांनी केलाय. या महिलांकडून आता संताप व्यक्त केला जात आहे.
महिलांचा गंभीर आरोप : "आम्ही 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' या योजनेचा अर्ज भरला आणि काही दिवसांनी खात्यात दोन महिन्यांची रक्कम देखील जमा झाली. मात्र, रक्कम जमा झाल्यानंतर जेव्हा आम्ही बँकेत गेलो, तेव्हा आमचे पैसे बँकेनं कट केल्याचं समोर आलं. तुम्हालाच जास्त पैसे भरावे लागतील, असं आम्हाला बँकेनं सांगितलं. बँकेनं अशा पद्धतीनं पैसे कट करू नये, असं सरकारनं सांगितल्याचं आम्ही बँकेला सांगितलं. शासनाला काय, आम्ही आमच्या नियमानं पैसे कट करत असल्याचं बँकेनं आम्हाला सांगितलं," असा गंभीर आरोप महिलांनी केलाय.