पुणे Majhi Ladki Bahin Yojana :राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडत असताना 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने'ची घोषणा केली. 1 जुलैपासून या योजनेची अंमलबजावी केली जाणार असल्याचंदेखील सांगण्यात आलं आहे. असं असताना अजूनही या योजनेसाठी महिलांना अर्ज भरता येत नाहीय. शासनाकडून अजूनही यासाठी वेबसाईटदेखील तयार झाली नाही. अंगणवाडी सेवकांकडून फक्त अर्ज जमा करून घेण्यात येत आहे. शासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात न आल्यानं या योजनेचा अर्ज करताना अनेक अडचणींना सामोरे जाव लागत आहे.
महिलांमध्ये गोंधळाची परिस्थिती : मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारनं राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. मात्र अजूनही यासाठी अर्ज कुठे करावा, अर्ज कसा करावा याची माहिती न दिल्यानं महिलांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
अर्ज करण्याची मुदत वाढवली :मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. याआधी 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती.
काय आहे वस्तुस्थिती ? : याबाबत ई-सेवा केंद्र येथे माहिती घेतली असता ते म्हणाले की, "शासनानं ही योजना जाहीर केली. 1 जुलै ते 14 जुलै पर्यंत महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र अजूनही कोणत्या वेबसाईटवर अर्ज करावं हे सांगितलेलं नसल्यानं मोठी गैरसोय होत आहे. महिला आमच्या इथं योजनेसाठी अर्ज करण्यासाठी येत आहेत. आम्ही त्यांना उत्पन्नाचा दाखला तसेच रहिवाशी दाखला काढण्यासाठी सांगत आहे. महिलांनी लवकरात लवकर रहिवासी दाखला तसेच उत्पन्नाचा दाखला काढावा, यासाठी आम्ही त्यांना माहिती देत आहोत. कारण हे दोन्ही दाखले काढण्यासाठी कमीत कमी आठ ते दहा दिवस लागतात. जर हे दाखलेच काढले नाही तर या योजनेसाठी अर्ज करता येणार नाहीयं. यामुळं जोपर्यंत शासनाकडून अर्ज भरण्यासाठी अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत महिलांनी हे दोन दाखले काढून घ्यावेत, असं आम्ही सांगत आहोत."