छत्रपती संभाजीनगर Anant Radhika Wedding Gifts :देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा 12 जुलै रोजी मुंबईमध्ये पार पडला. या विवाह सोहळ्यात अनेक प्रसिद्ध व्यक्ती आमंत्रित होत्या. यामध्ये देशातील बारा ज्योतिर्लिंग मधील शेवटचे महत्त्वाचे मंदिर असलेल्या, घृष्णेश्वर मंदिराचे पुजारी शरद दांडगे (Sharad Dandge) यांचा देखील समावेश होता. त्यांनी या विवाह सोहळ्यात सहभाग घेत वधूवरांना आशीर्वाद दिला. त्यावेळी त्यांना अंबानी कुटुंबीयांनी चांदीचा प्रसादाचा डब्बा आणि ॲपल फोन रिटर्न गिफ्ट दिले. यावेळी आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याची भावना, शरद दांडगे यांनी "ई टीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.
शरद दांडगे यांना होते निमंत्रण : शहरातील प्रसिद्ध तबलावादक शरद दांडगे हे वेरूळ येथील बारावी ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिराचे पुजारी आहेत. त्यांना प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांच्या विवाहासाठी विशेष निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. एक महिन्यापूर्वी त्यांना अनंत अंबानी यांच्या कार्यालयातून संपर्क करण्यात आला होता. विवाह सोहळ्यासाठी तुम्ही निमंत्रित आहात असं त्यांना सांगण्यात आलं होतं. मात्र, याबाबत कोणालाही न सांगण्याची त्यांना अट घालण्यात आली होती. दांडगे त्यांनी होकार कळवल्यानंतर, त्यांच्यासाठी विमानाचे तिकीट आणि मुंबई येथील आलिशान हॉटेलमध्ये पाच दिवस राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. विवाह सोहळ्यात सर्वांसाठी बसण्याची वेगळी व्यवस्था होती. तिथे सिनेअभिनेते, देशातील राजकारणी, साधुसंत अशा सर्व क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी होती. या विवाह सोहळ्यात अभूतपूर्व अनुभव आला असून अतिशय प्रेमाने, भक्ती भावाने आणि मनःपूर्वक स्वागत झाल्याचं शरद दांडगे यांनी सांगितलं.