नागपूर Nagpur Hit And Run Murder Case : पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा हिट अँड रन सुपारी किलिंग प्रकरणात पोलिसांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाचे (MSME ) संचालक प्रशांत पार्लेवार यांनाही अटक केली. प्रशांत पार्लेवार हे या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि गडचिरोली नगर विकास सहायक संचालक असलेल्या अर्चना पुट्टेवार यांचे भाऊ आहेत. याप्रकरणी अजून काहीजण पोलिसांच्या रडावर असून त्यांनाही लवकर अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुपारी किलरला लाखोंचं आमिष : पुरुषोत्तम पुट्टेवार हत्या प्रकरणात मास्टरमाइंड मुख्य आरोपी अर्चना पुट्टेवार आणि त्यांचा भाऊ प्रशांत पार्लेवार यांनी अगदी नियोजित पद्धतिनं हत्येचा कट रचला. आरोपींनी त्यांच्या घरातील चालक सार्थक बागडे, नीरज निमजे आणि सचिन धार्मिक यांना लाखो रूपायांचं आमिष दाखवून पुरुषोत्तम पुट्टेवार यांची कारनं चिरडून हत्या केली. आरोपींनी या कामात दोन कार आणि पाळत ठेवण्यासाठी दुचाकीचा वापर केला. ही सर्व वाहनं पोलिसांनी जप्त केली आहेत.
आरोपीला सुरू करायचा होता बार : पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी सचिन धार्मिक याला स्वतःचा बार सुरू करायचा होता. मात्र त्याचा अर्ज वारंवार रद्द होत असल्याची माहिती आरोपी अर्चना पुट्टेवार आणि तिचा भाऊ प्रशांत पार्लेवार यांना होती. त्यांनी ही बाब हेरून सचिन धार्मिक याला बारचा परवाना आणि जागा मिळवून देण्याचं आमिष दिलं होतं, अशी माहिती देखील तपासात उघड झाली. महत्त्वाचं म्हणजे पुरुषोत्तम पुट्टेवार यांची हत्या झाल्यानंतर आरोपी सचिन धार्मिकनं 'बार'चा परवाना मिळवण्यासाठी नव्यानं अर्ज दाखल केला.
काय आहे प्रकरण : सासऱ्याची कोट्यवधी रुपयांची संपत्ती केवळ आपल्यालाच मिळावी, या हेतूनं नागपुरात सुनेनं सासऱ्याची सुपारी देऊन हत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली. पुरुषोत्तम पुट्टेवार असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या घटनेची मास्टरमाइंड अर्चना मंगेश पुट्टेवार या आहेत. त्या गडचिरोलीत टाऊन प्लॅनिंग विभागात उच्चपदस्थ अधिकारी आहेत. अर्चनान भाऊ प्रशांतच्या मदतीनं सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार यांना भर रस्त्यामध्ये भरधाव कारनं चिरुडन हत्या केली. या घटनेनंतर तब्बल 18 दिवसानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर नागपूर पोलिसांनी अर्चना पुट्टेवार यांच्यासह त्यांचा भाऊ प्रशांत पार्लेवार आणि प्रत्यक्षात हत्याकांड घडणाऱ्या तीनही भाडोत्री सुपारी किलरला देखील अटक केली आहे.