खासदार विनायक राऊत यांची प्रतिक्रिया रत्नागिरी MP Vinayak Raut :नितीश कुमार इंडिया आघाडीचे प्रमुख नेते होते. त्यांनी भाजपाशी अचानक युती केल्यामुळं देशवासीयांचा विश्वासघात झालाय, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली. यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले की, 'नितीश कुमार यांचं भाजपासोबत जाणं लोकशाहीसाठी घातक आहे.'
अजित पवार गटात बेबनाव : तसंच सत्तेसाठी गेलेले गद्दार एकमेकांच्या खांद्यावर बसणार आहेत. अजित पवार गटात बेबनाव सुरू झाला आहे. आता हेच शिंदे गटातही सुरू होईल. लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी शिंदे गटातील लोकांना वटाण्याच्या अक्षदा लावल्या जातील, अशी टीका खासदार राऊत यांनी केली.
मराठा समाजाला फसवलं : सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची आवश्यकता होती, मात्र अधिसूचनेमध्ये तसा उल्लेख देखील नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना फसवलं आहे. तसंच मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजालासुद्धा फसवलं आहे, असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केलाय. सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळेपर्यंत जरांगे पाटील यांनी शांत बसू नये. मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये, अशी आमची मागणी आहे. संसदेतच आरक्षण कायदा संमत होणे आवश्यक आहे. मात्र, आरक्षणाचा हा विचार टिकणारा नाही. मराठा समाजाला संसद स्वतंत्र आरक्षण देऊ शकतं. कालची अधिसूचना या बाबतीत परिपूर्ण नाही. निवडणुकीनंतर सरकारकडून जीआर रद्द होण्याची शक्यता असल्याची टीका खासदार विनायक राऊत यांनी केली.
नितेश राणे विश्वगुरू : नितेश राणे हे महान विश्वगुरू आहेत. हा पोपट भाजपानं पाळलेला आहे. त्यांच्या अंगात नेतेपद भिनलेलं आहे. काही दिवसांतच त्यांचा कपाळमोक्ष होईल, अशी टीका देखील खासदार विनायक राऊत यांनी यावेळी केली.
हे वाचलंत का :
- नितीश कुमार नवव्यांदा घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ; आतापर्यंत कधी व कशी मारली पलटी? जाणून घ्या नवीन रेकॉर्ड
- पंतप्रधानांना मातृभाषेचं प्रेम लपवता येत नाही, मग आपण का मराठीचं प्रेम लपवावं : राज ठाकरे
- मुंबईतील प्रदूषणाला मुख्यमंत्री आणि त्यांची बिल्डर लॉबी जबाबदार, आदित्य ठाकरे यांचा आरोप