राज्यघटना न बदलण्याचा मुद्द्यावर बोलताना खासदार सुनील तटकरे (Reporter) पालघरSunil Tatkare Criticized Anil Deshmukh:घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करून भारताची राज्यघटना बनवली. कालानुसार त्यात दुरुस्त्या करण्यात आल्या; परंतु दुरुस्त्या आणि घटना बदल यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. राज्यघटना कोणालाही बदलता येणार नाही, याची हमी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मी देत असताना घटना बदलण्याबाबत विरोधक मात्र बेफाम आणि चुकीचे आरोप करीत आहेत. त्यांना जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करायचा आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केला.
खा. तटकरे यांचे विविध मुद्यांवर भाष्य :पालघर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी डहाणू येथे आयोजित सभेत तसंच त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत खा. तटकरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. यावेळी डॉ. हेमंत सावरा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार आनंद ठाकूर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, वसई विरार जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक, संतोष मराठे, पालघर जिल्हा उपाध्यक्ष पांडूरंग बेलकर, जव्हारचे माजी नगराध्यक्ष संदीप वैद्य, हरेश मुकणे,विपुल राऊत आदी उपस्थित होते.
मनमोहन सिंग यांचा निर्णय फाडणारे पोरकट :सुनील तटकरे म्हणाले, की राज्यघटना बदलणं तेवढं सोपं नाही. विधेयकात बदल करणे, घटनेत दुरुस्ती करणे आणि राज्यघटना बदलणे यात कमालीची तफावत आहे. राज्यघटना बदलणार नाही याची हमी दिलेली असताना वारंवार संविधान दाखवून घटना बदलण्याचा राहुल गांधी यांचा आरोप हा पोरकटपणा आहे. त्यांनी त्यांच्याच पंतप्रधान असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांनी बनवलेल्या महत्त्वाच्या विधेयकाची प्रत परदेशातून आल्यानंतर टराटरा फाडली. त्यामुळे त्यांना मोदीही असेच करतील असा भास होता असावा, अशी टीका तटकरे यांनी केली.
अनिल देशमुखच येणार होते भाजपात :नाशिकमध्ये अध्यक्ष शरद पवार आणि जयंत पाटील यांची भेट घेत असल्याच्या आमदार अनिल देशमुख यांच्या विधानावर तीव्र नापसंती व्यक्त करताना तटकरे यांनी आमदार देशमुख यांच्यावर टीका केली. देशमुख हेच भाजपात येणार होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.
राष्ट्रवादीत कोणीही नाराज नाही :मोदी यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वाराणसी येथे सर्वच घटक पक्षांचे नेते हजर होते. त्यानंतर झालेल्या मोदी यांच्या महाराष्ट्रातील सभांमध्ये अजित पवार यांच्या असलेल्या अनुपस्थितीकडे लक्ष वेधता तटकरे यांनी अजितदादा आजारी असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणीही नाराज नाही. छगन भुजबळ, दादा भुसे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवळ आदी नेत्यांशी मी चर्चा केली आहे. सर्व नेते महायुतीच्या प्रचारात सक्रिय असल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधकांची टीका नैराश्यातून :मोदी यांनी ३७० कलम रद्द केल्यामुळे काश्मीरमध्ये झालेला बदल, राम मंदिराची निर्मिती आणि अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि गेल्या दहा वर्षांत मोदी यांनी देशात विविध समाज घटकांसाठी लागू केलेल्या लाभार्थी योजना आदींचा उपयोग या लोकसभेच्या निवडणुकीत नक्की होणार आहे. विरोधक काही म्हणत असले आणि भाजपाला दोनशेच्या आत जागा मिळतील असे सांगत असले तरी घोडा मैदान जवळच आहे. चार तारखेला ते स्पष्ट होणार आहे. जनता कोणाच्या मागे आहे, हे मोदी यांच्या ठिकठिकाणच्या सभांना होणाऱ्या गर्दीमुळे स्पष्ट झाले आहे, असा दावा तटकरे यांनी केला. त्याचबरोबर विरोधकांची टीका नैराश्यातून आणि पराभूत मानसिकतेतून आली असल्याचे त्यांनी सांगितले.
एका विचारावर निष्ठा :मोदी यांच्या सभेत घोषणा देणाऱ्या किरण सानप नावाच्या शेतकऱ्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचे निदर्शनास आणताच लोकशाहीत कुणी कुणाची भेट घेऊ शकते. त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर नाशिक येथे पवार थांबलेल्या हॉटेलमध्ये गेल्याच्या वृत्ताबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. लांबचा प्रवास करून आल्यानंतर वॉशरूमला गेलो होतो, त्या हॉटेलमध्ये माझी कुणाशीही भेट झाली नाही. मी एका ठराविक विचाराने चालणारा आणि काही संकल्पना मनाशी घेऊन वावरणारा नेता आहे. अजित पवार यांच्यावर आमची निष्ठा आहे आणि या निष्ठेत तसूभरही फरक पडणार नाही, असे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, सिंचन घोटाळ्या प्रकरणात अजित पवार आणि आपल्यावरच्या आरोपाची चौकशी झाली असून, त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केल्याने आपण त्यांचे आभार मानतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा :
- मणिपूर हिंसाचारात 'सुपरपॉवर'चे काय झाले? प्रकाश आंबेडकर यांची मोदींवर टीका - Prakash Ambedkar Criticized PM Modi
- मोदी सरकार फसवेगिरी करणारं, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका; मनमाडच्या सभेत शरद पवारांचा घणाघात - Sharad pawar
- लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा जातीची गोळाबेरीज; कोणत्या मतदारसंघात कोणत्या जातीचं वर्चस्व? - Caste Equations In Mumbai