मुंबईSandipan Bhumre Met Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यानंतर महायुतीच्या अनेक नेत्यांनी राज ठाकरेंची भेट घेतलीय. आज आज शिवसेनेच्या वर्धापन दिनी औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार संदिपान भुमरे यांनी 'शिवतीर्थ'वर राज ठाकरे यांची भेट घेतली. तसंच त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. तर, राज ठाकरेंनी देखील भुमरे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काल (मंगळवारी) शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली होती.
राज ठाकरेंची सदिच्छा भेट : या भेटीवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर, दिलीप धोत्रे देखील उपस्थित होते. खासदार संदिपान भुमरे यांनी राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेतलीय. कारण लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिला होता. तसंच राज्यातील कोकण, ठाणे, कल्याण, मुंबईत राज ठाकरे यांनी सभा घेतल्या होत्या. महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्यावं, असं आवाहन त्यांनी त्यावेळी मतदारांना केलं होतं. त्यामुळं राज ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी ही सदिच्छा भेट घेतली असल्याचं संदिपान भुमरे यांच्याकडून सांगण्यात येत आहे.