पिंपरी चिंचवड (पुणे) Minister Uday Samant: मंत्री उदय सामंत म्हणाले, पुण्यामध्ये औद्योगिक क्षेत्राचा विकास वेगानं होत आहे. विविध प्रकारच्या उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा येथे असून नवीन उद्योगांसाठी चांगली संधी आहे. (distribution of export awards) पुण्याची क्षमता राज्यासह देशाला कळावी यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यापुढे अशा प्रकारचा 'उद्योजकांचा मेळा' प्रत्येक जिल्ह्यात भरविण्यात येईल. यामुळे त्या जिल्ह्यात उद्योगस्नेही वातावरण तयार होईल. विविध उद्योजक आकर्षित होऊन तेथील उद्योगांमध्ये वाढ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
'निर्यात धोरण २०२३' जाहीर:अल्ट्रामेगा प्रकल्पासोबत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाला चांगल्या सुविधा देणं गरजेचं आहे. उद्योजक उद्योग करीत असताना त्यासाठी निर्यात ही महत्त्वाची असून हीच बाब विचारात घेऊन 'निर्यात धोरण २०२३' जाहीर करण्यात आले आहे. या धोरणाच्या माध्यमातून उद्योजकांना अधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नवीन माहिती तंत्रज्ञान धोरणामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात डेटा सेंटर निर्माण होत असून आगामी काळात जगातील डेटा सेंटरचे हब म्हणून महाराष्ट्र राज्य ओळखले जाईल, असा विश्वास सामंतांनी व्यक्त केला.
कृत्रिम बुद्धिमत्ता पार्क निर्माण करण्याबाबत विचार:आगामी काळात देशातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण आणण्यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता पार्क निर्माण करण्याबाबत विचार करण्यात येईल. राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता पार्क निर्माण करताना संरक्षण, आरोग्य, क्रीडा, कृषी आदी क्षेत्रांचा विचार करण्यात येईल. कृत्रिम बुद्धिमत्तेसोबत इलेक्ट्रिकल वाहन, हायड्रोजन या क्षेत्राच्या विकासाबाबतही प्रयत्न करण्यात येत आहे, असंही मंत्री सामंत म्हणाले.
गडचिरोली उद्योगनगरी म्हणून ओळखली जाईल:उद्योजकांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठी उद्योजकांशी सतत चर्चा करण्यात येत आहे. शासनाच्यावतीनं त्यांना उद्योगपुरक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे राज्यात परकीय गुंतवणूक वाढत असून उद्योगात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात १ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू असून येत्या काळात गडचिरोली उद्योगनगरी म्हणून ओळखली जाईल, असंही सामंत म्हणाले.