मुंबई Son Mother HSC Result: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता 12वीचा निकाल मंगळवारी जाहीर केला. बोर्डाची 12वीची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 93.37 टक्के इतकी आहे. यावर्षी मुलींच्या उत्तीर्णतेचं प्रमाण 95.44 टक्के आहे, तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 91.60 टक्के आहे. याच परीक्षेला मुंबईच्या कुर्ल्यातील आई आणि मुलगा देखील बसले होते. या परीक्षेत दोघंही उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.
एका आईची जिद्द : असं म्हणतात माणूस आयुष्यभर शिकत असतो. शिकण्याचं कोणतंही वय नसतं. याचाच प्रत्यय कुर्ल्यातील या घटनेनं आलाय. या आईचं नाव 'गीता पासी' आहे. 2003 मध्ये वडिलांचं निधन झालं आणि घरातील जबाबदारी गीता यांच्या खांद्यावर पडली. त्यानंतर 2004 मध्ये गीता पासी यांचा विवाह झाला. आधी वडिलांचा मृत्यू त्यानंतर लगेचच झालेलं लग्न यामुळं घर आणि संसाराची जबाबदारी गीता यांच्या अंगावर पडली. इच्छा असून सुद्धा त्यांना शिक्षण सोडावं लागलं. मात्र, गीता यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी कायम होती. एका आईची जिद्द काय असते याचा प्रत्यय गीता यांच्या संघर्षातून येतो.
मुलापेक्षाही आईनं मिळवले जास्त गुण: 'गीता पासी' आणि त्यांचा मुलगा 'आर्यन पासी' हे दोघेही बारावीच्या परीक्षेला बसले आणि दोघेही बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यात खास बाब म्हणजे मुलापेक्षाही आईनं जास्त गुण मिळवले आहेत. गीता यांचा मुलगा आर्यनला ५२ टक्के गुण पडले असून गीता यांना ५३ टक्के गुण पडले आहेत. गीता यांनी नेहमीच अभ्यासाला पसंती दिल्यानं त्यांनी कला शाखेत तर, आर्यन विज्ञान शाखेत चांगल्या गुणांनी पास झालाय. आर्यन चांगल्या गुणांनी पास झाला याचा मला अभिमान असल्याचं आई गीता सांगतात.
गीता यांना पतीची खंबीरपणे साथ : गीता यांनी सांगितलं की, मी आणि अर्यन एकत्र बसून अभ्यास करायचो. पूर्ण वर्षभर आम्ही याचं पद्धतीनं अभ्यास केला. यासाठी मी आणि माझ्या पतीनं घरातील कामे, नोकरी या रोजच्या दैनंदिन कामांची वाटणी करून घेतली होती. आमच्या तिघांमधील जो कोणी घरी लवकर येईल त्यानं घरातील सर्व कामं करायची, हे आमचं ठरलं होतं. त्यामुळं मी आणि आर्यन आम्हाला दोघांनाही अभ्यासाला वेळ मिळायचा. मी सकाळी लवकर उठून अभ्यास करायची तर आर्यन रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचा. एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं म्हणतात. मात्र, इथं एका यशस्वी स्त्रीमागे त्यांचे पती खंबीरपणे उभे राहिलेत.