मुंबई Government Decisions: आगामी विधानसभा निवडणूक ही अटीतटीची असणार आहे. महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीनंही चांगलीच कंबर कसलीय. त्यामुळं थेट लोकांशी संबंधित असलेल्या योजना राबवण्याचा धडाका महायुती सरकारनं लावलाय. मात्र, कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते, त्यामुळं एका आठवड्यात आता दोनवेळा मंत्रिमंडळ बैठका होताना पाहायला मिळत आहे. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चाळीसहून अधिक निर्णय घेतले गेले. दोन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर आता पुन्हा शुक्रवारी मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आली आहे.
उपाहारगृहातही गर्दी - मंत्रालयाच्या पायऱ्यावर, लिफ्टमध्ये, आवारात सर्वत्र गर्दी पाहायला मिळते आहे. त्यातच मंत्रालयाच्या उपाहारगृहातही मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यानं जेवण आणि नाश्ता अर्ध्या तासात संपत आहे. इतकंच काय आता मंत्रालयात संध्याकाळी सहानंतर काम करताना अनेक विभागातील कर्मचारी दिसत आहेत.
निर्णयासाठी सर्वांचीच धावाधाव -आपल्या कामाचा जीआर काढून घेण्यासाठी आमदारांपासून मंत्र्यांची धावाधाव सुरू आहे. लोकप्रिय योजनांचे निर्णय तर होताना पाहायला मिळत आहेतच. मात्र महायुतीमधील नेत्यांच्या लाभाचे निर्णय सुद्धा मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला मिळत आहेत. अनेक निर्णय हे नियमांना डावलून घेतले जात असल्याची टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत तर शासन निर्णय काढण्याचा धडाका सुरू आहे. दिवसाला शेकडो शासन निर्णय जारी होताना पाहायला मिळत आहेत. त्यासाठी आमदारांपासून मंत्र्याची चांगलीच धावाधाव सुरू झालीय. आचारसंहितेच्या आधीच टेंडर काढण्यासाठी सर्वांनी ताकद पणाला लावलीय. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींना निधीची खैरात करणारे शासन निर्णय सर्वाधिक पाहायला मिळत आहेत.