मुंबईIndustrial Safety Department:राज्य सरकारच्या अखत्यारीतील औद्योगिक सुरक्षा विभागात आता रिक्त असलेल्या विविध पदांची भरती केली जाणार आहे. औद्योगिक सुरक्षा विभागात गेल्या दहा वर्षांपासून अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. यामध्ये सहाय्यक संचालक, उपसंचालक दर्जाच्या पदांचा समावेश आहे. राज्य सरकारनं आता गेल्या काही वर्षांत रिक्त राहिलेल्या सुमारे 40 पेक्षा अधिक पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती विभागाच्या सचिव विनिता वेद सिंघल यांनी दिली.
कोणत्या पदांची होणार भरती :राज्य सरकारच्यावतीनं आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औद्योगिक सुरक्षा उपसंचालक या पाच रिक्त पदांसाठी तर सहाय्यक संचालक या 34 रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. सध्या औद्योगिक सुरक्षा विभागात केवळ ३ अप्पर सचिव आणि एक संचालक कार्यरत आहेत. त्यामुळे राज्यातील शेकडो कारखान्यांवर वचक ठेवणं शक्य होत नाही. त्यामुळे सर्व रासायनिक कारखाने अनिर्बंधपणे सुरू आहेत.
काय आहे औद्योगिक सुरक्षा विभागाची स्थिती :राज्यात सुमारे 34 हजार कारखाने आणि रासायनिक कंपन्या नोंदणीकृत आहेत. राज्यात असलेले अनेक उत्पादन प्रकल्प आणि अवजड उद्योगाच्या कारखान्यांमध्ये तसंच एमआयडीसीमध्ये असलेल्या अनेक कारखान्यांमध्ये सुरक्षा कायद्याची योग्यरीत्या अंमलबजावणी केली जात नाही. सुरक्षा कायदे हे कुणीही नियंत्रित करीत नसल्यामुळे या कायद्यांची पायमल्ली होत आहे. औद्योगिक सुरक्षा विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्यानं याची योग्यरीत्या अंमलबजावणी होणं कठीण होतं. औद्योगिक सुरक्षा विभागाकडून भरतीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला जात होता. अखेर ही भरती आता केली जात आहे. या भरती प्रक्रियेनंतर विभागाकडे नवीन 40 अधिकारी दाखल होणार आहेत. यामुळे राज्यभरातल्या विभागीय स्तरांवरील कार्यालयांमध्ये तसंच उद्योग विभागाच्या अन्य कार्यालयांमध्ये औद्योगिक सुरक्षा विभागाचे अधिकारी हे नियंत्रणासाठी उपलब्ध होतील. त्यामुळे औद्योगिक सुरक्षा आणि कामगारांच्या विविध सुरक्षा संदर्भातील तक्रारी तसंच मागण्या यांचे वेळेत निराकरण करणं शक्य होणार असल्याचं सिंघल यांनी सांगितलं.
राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताह :४ मार्च ते ११ मार्च दरम्यान औद्योगिक सुरक्षा समितीतर्फे राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताहाचं आयोजन केलं जातं. हा उपक्रम प्रामुख्यानं आस्थापना आणि कारखाना स्तरावर प्रत्येक उद्योगानं राबवावा, अशी अपेक्षा असते. उद्योग प्रक्रियेतील सुरक्षेमध्ये संपूर्ण सुरक्षा साध्य करण्यासाठी कारखान्यातील प्रक्रियेशी संबंधित जोखीम तसेच व्यक्तिगत आणि आरोग्यविषयक तपशील प्रत्येकाने समजून, जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. याचं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे, प्रगत तंत्रज्ञान तसेच उत्पादन पद्धतींमध्ये कुठेही चूक झाली तर त्याचे परिणाम गंभीर स्वरूपाचे होत असतात. आता नव्या भरती प्रक्रियेमुळे सुरक्षेवर भर आणि वचक ठेवता येणार आहे.
हेही वाचा :
- नागपूर-पुण्याचं अंतर 'इतक्या' तासात होणार पूर्ण; छत्रपती संभाजीनगर-पुणे सहा पदरी महामार्गाच्या करारावर स्वाक्षऱ्या
- मुख्यमंत्री आज रत्नागिरी दौऱ्यावर, 400 कोटींच्या विविध विकासकामांचं करणार भूमिपूजन
- 'त्या' FIR मध्ये रोहित पवारांचं नाव नाही, एजन्सीची भीती दाखवली जात आहे; सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल