महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जनतेच्या पैशांतून 'मोदी की गॅरंटी' जाहिरात! आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार - पृथ्वीराज चव्हाण - Modi ki Guarantee

Modi ki Guarantee : मोदी की गॅरंटी या जाहिरातीवर आमचा आक्षेप असून आम्ही या विषयावर निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

फाईल फोटो
फाईल फोटो

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 8, 2024, 5:55 PM IST

पत्रकार परिषद

मुंबई :Modi ki Guarantee : देशात लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणूक कार्यक्रमाची घोषणा देखील अगदी काही दिवसांत होणार आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक प्रचाराला लागले आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "मोदी की गॅरंटी" जाहिरातीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे. तसंच, आपण याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती आज शुक्रवार (दि. 8 मार्च) रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

'सरकारी पैशाचा वापर थांबवा' : भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक प्रचारा संदर्भात आणि जाहिरातीबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. ते आज पत्रकारांशी बोलत होते. केंद्र सरकारची "मोदी की गॅरंटी" अशा प्रकारे असलेली कॅम्पेनिंग ही एका व्यक्तीचा प्रचार आहे. मोदी हे भाजपाचे लोकसभेचे उमेदवार आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या निधीचा वापर करून एका व्यक्तीचा प्रचार करणं चुकीचं असल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. त्यांना केंद्र सरकारची गॅरंटी किंवा प्रधानमंत्री की योजना म्हणायचं असेल त्याला आमची काही हरकत असणार नाही. मात्र, भाजपा गॅरंटी किंवा एका व्यक्तीची किंवा मोदी की गॅरंटी हे योग्य नसून हे आचार संहितेचा भंग करणारं काम आहे असंही ते म्हणाले आहेत.

निवडणूक आयोगाकडे तक्रार करा : आतापर्यंत सरकारी पैशाने मोदी की गॅरंटी जाहिरात झालेली आहे. त्या सगळ्या जाहिरातींचा खर्च भाजपा किंवा नरेंद्र मोदी यांच्याकडून वसूल केला पाहिजे अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. जनतेच्या पैशातून मोदींच्या नावानं प्रचार करायचं काम करत आहेत. भाजपा कुठंही दिसत नाही. फक्त मोदी मोदी आणि मोदी दिसंत आहेत. हे सर्व सरकारी पैशातून करता कामा नये एवढच आमचं म्हणणे आहे, असंही ते म्हणाले आहेत. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार पेट्रोल-डिझेल कंपनीला आदेश देण्यात आले आहेत की, प्रत्येक ठिकाणी मोदी की गॅरंटीच्या जाहिराती लावा. अशा प्रकारे सरकारी पैशातून एका व्यक्तीचा प्रचार करणं यावर आमचा आक्षेप आहे. या संदर्भातील आम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार असल्याचंही चव्हाण म्हणालेत.

भाजपातील मोदींविरुद्ध बंडाचं स्वागतच : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाविकास आघाडीसोबत येण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं. यावर चव्हाण म्हणाले की, या संदर्भात आमच्या महाविकास आघाडीत चर्चा झाली नाही. मात्र, भाजपाचा कोणीही मोठा नेता मोदींवर नाराज होऊन मोदींविरोधात बंड करत असेल तर त्याचे सर्वच विरोधी पक्ष स्वागत करतील. आम्ही देखील स्वागत करू असंही चव्हाण म्हणालेत. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सभेसाठी शिवाजी पार्क येथील मैदानाची परवानगी मिळाली आहे. आमच्यापुढे दोन मार्ग होते. एक म्हणजे बीकेसी आणि दुसरं शिवाजी पार्क. त्यातील शिवाजी पार्क आम्हाला मिळाले आहे.

देशात अघोषित आणीबाणी सुरू : शिवाजी पार्क येथे होणारा कार्यक्रम इंडिया आघाडीचा कार्यक्रम आहे. देशातील बहुतेक इंडिया आघाडीतील ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. भाषण कोणाची होणार आहेत हे कार्यक्रम पत्रिकेत दिसेल असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. देशात हुकूमशाहीची परिस्थिती निर्माण झाली असून ही अघोषित आणीबाणी चालू आहे. मोदी जर तिसऱ्यांदा निवडून आले तर त्यावर शिक्कामोर्तब होईल. हे थांबवण्यासाठी आम्ही सर्व विरोधी पक्ष एकत्र आलो आहोत. आमच्यात कुठल्याही प्रकारचे मतभेद नसल्याचंही चव्हाण म्हणाले आहेत.

हेही वाचा :

1शिरूर लोकसभा मतदार संघाचा तिढा कायम! उमेदवार कोण असणार; नेता की अभिनेता?

2'शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्यानं साध्या आमदाराला धमकी दिली असेल तर...'; फडणवीसांचा पवारांना खोचक टोला

3'अजित पवार यांच्यासोबत एकच खासदार तरी भाजपा त्यांना योग्य न्याय देईल', संजय काकडे स्पष्टच बोलले

ABOUT THE AUTHOR

...view details