अमरावती Mobile ATM Van : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीनं मेळघाटातील दुर्गम गावात वसलेल्या आदिवासी बांधवांसाठी प्रजासत्ताक दिनाच्या पर्वाला मोबाईल एटीएमचा शुभारंभ करण्यात आला. बँकेचे अध्यक्ष आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते या मोबाईल एटीएमचे उद्घाटन करण्यात आले. 27 जानेवारीपासून जिल्हा मध्यवर्ती बँकेची ही मोबाईल एटीएम सेवा मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांनी दिली.
मेळघाटातील आदिवासी बांधवांसाठी मोबाईल एटीएम व्हॅन; आठवडी बाजाराच्या दिवशी मिळणार सेवा - Mobile ATM Van
Mobile ATM Van : मेळघाटातील आदिवासी बांधवांना व्यवहार करण्यासाठी त्यांचे पैसे सहज उपलब्ध व्हावेत या उद्देशानं त्यांच्या गावापर्यंत मोबाईल एटीएम व्हॅन धावणार आहे. गावांचा आठवडी बाजार ज्या दिवशी असतो त्या दिवशी हे मोबाईल एटीएम आदिवासी बांधवांना त्यांच्या गावात उपलब्ध होणार आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या गावांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय.
Published : Jan 27, 2024, 11:21 AM IST
असं आहे मोबाईल एटीएम :जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या मोबाईल एटीएममधून मेळघाटातील आदिवासी बांधवांना आपल्या बँक खात्यातून सहज रक्कम काढता यावी, असा या उपक्रमाचा उद्देश आहे. या मोबाईल एटीएमवर या एटीएम मशीनचा वापर कशा पद्धतीनं करायचा या संदर्भात लिखित स्वरूपात सूचना आहे. या व्हॅनमध्ये ज्या ठिकाणी एटीएम मशीन बसवण्यात आलीय त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा देखील आहे. बँकेच्या खातेदारांकडं एटीएम कार्ड नाही, अशा खातेदारांना या मोबाईल एटीएममध्ये असणाऱ्या बँकेच्या कर्मचाऱ्यांकडे बँकेचे पासबुक दाखवून खात्यात पैसे टाकणे आणि काढण्याची सुविधा राहणार आहे. मोबाईल एटीएम वर लागलेल्या छोट्याशा स्क्रीनवर बचतीच्या महत्त्वासंदर्भात माहिती देखील दिली जाणार आहे.
...हा व्यवहार नव्हे तर सेवा : या मोबाईल एटीएम व्हॅन संदर्भात प्रतिक्रिया देत अभिजीत ढेपे म्हणाले की, "अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचा व्यवहार वाढावा असा या मोबाईल एटीएम व्हॅनचा उद्देश नाही. तर, मेळघाटातील दुर्गम गावांमध्ये वसलेल्या आदिवासी बांधवांना बँकेचे व्यवहार आपल्या गावात राहूनच करता यावे, त्यांना त्यांचे पैसे आपल्या घराजवळच सहज उपलब्ध व्हावे असा या उपक्रमाचा उद्देश आहे. तसंच बँकेच्या व्यवहारापेक्षा आम्ही या मोबाईल एटीएम द्वारे आदिवासी बांधवांना सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहोत असंही ते म्हणाले.
हेही वाचा -