महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'BJP आलीय, मारवाडी बोलो,' असं म्हणत मराठी महिलेवर अरेरावी करणाऱ्या व्यक्तीला मनसेचा दणका

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत नेहमीच मराठी विरुद्ध अन्य भाषक वाद पाहायला मिळतो. आता निवडणुकीनंतर पुन्हा एकदा या वादाला तोंड फुटलंय.

MNS slams man who sexually harassed Marathi woman
मराठी महिलेवर अरेरावी करणाऱ्या व्यक्तीला मनसेचा दणका (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : 17 hours ago

Updated : 16 hours ago

मुंबई -विधानसभा निवडणुका पार पडल्या असून, निकालात महायुतीला प्रचंड बहुमत मिळालंय. विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलाय. खरं तर ही निवडणूक अनेक मुद्द्यांमुळे चर्चेत राहिली. त्यात खऱ्या अर्थाने निवडणुकीचं चित्र 'कटेंगे तो बटेंगे' आणि त्यानंतर देण्यात आलेल्या 'एक हे तो सेफ है' या नाऱ्यामुळे पालटले. निवडणुकीत 'एक है तो सेफ है' या घोषणेप्रमाणे एकवटलेला महाराष्ट्र आता निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भाषावादात अडकल्याचे दिसून येतंय. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत नेहमीच मराठी विरुद्ध अन्य भाषक वाद पाहायला मिळतो. आता निवडणुकीनंतर पुन्हा एकदा या वादाला तोंड फुटलंय आणि याला कारण ठरले आहे ती मुंबईचे सांस्कृतिक हब म्हटले जाणाऱ्या गिरगावातील एक घटना.

इथून पुढे मारवाडी भाषेतच बोलायचं : त्याचं झालं असं की, मुंबईत मराठी संस्कृतीचं सांस्कृतिक हब म्हटल्या जाणाऱ्या गिरगावातील खेतवाडीत विमल नावाच्या एक महिला काही वस्तू विकत घेण्यासाठी एका मारवाडी दुकानदाराच्या दुकानात गेल्यात, तिथे त्यांनी मराठीमध्ये संभाषण केलंय. त्यांनी मराठीत आपल्याला लागणाऱ्या वस्तू मागितल्याने संबंधित दुकानदाराने त्यांना 'मराठीत का बोलता? मारवाडीमध्ये बोला,' असा आग्रह धरला. इतक्यावर न थांबता या व्यापाऱ्याने पुढे जाऊन 'आता भाजपाची सत्ता आलीय. आता इथून पुढे मारवाडी भाषेतच बोलायचं,' असा आग्रह केल्याचा आरोप संबंधित महिलेने केलाय.

आमच्यात वाद लावले जाताहेत :महिलेचे म्हणणे आहे की, या घडल्या प्रकारानंतर मी लगेचच स्थानिक आमदार मंगल प्रभात लोढा यांच्याकडे तक्रार देण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांनी आमची तक्रार ऐकून घेतली नाही. आम्ही संबंधितांना ओळखत नाही, असं या आमदारांचं म्हणणं आहे. आमच्यात वाद लावले जात आहेत, असं लोढा म्हणतात. मी आतापर्यंत लोढा यांना सहकार्य केलंय. ते आमचे आमदार आहेत. आमच्या मलबार विधानसभा मतदारसंघातला प्रत्येक मतदार तुमचा आहे. मग यात ओळख असण्याचे आणि नसण्याचे कारण काय? लोढा म्हणतात आम्ही यांना ओळखत नाही. तुम्ही आमचे आमदार आहात. तुम्हाला ओळख असणे गरजेचे आहे का? असा सवालदेखील या महिलेने विचारलाय. या घटनेनंतर संबंधित महिलेने लगेचच घडला प्रकार गिरगावातील स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांना सांगितला, या महिलेचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी लगेचच संबंधित व्यापाऱ्याला शाखेत आणले आणि जाब विचारला. त्याला संबंधित व्यापाऱ्याने आपण मस्करीमध्ये असं वक्तव्य केल्याचं म्हटलंय. मनसे शाखेत संबंधित व्यापाऱ्याने दिलेल्या उत्तराने मनसेचे पदाधिकारी संतापले आणि त्यांनी मनसे स्टाईल सणसणीत समज दिली.

मुंबई आधी मराठी माणसाची आहे :या प्रकरणाची माहिती मिळताच आमदार मंगल प्रभात लोढा यांनी प्रतिक्रिया दिली असून, गिरगावातील खेतवाडी परिसरात घडलेल्या भाषिक द्वेष पसरवणाऱ्या घटनेचा निषेध! मराठी भाषा ही आपल्या महाराष्ट्राची मातृभाषा आहे, आपली अस्मिता आहे. त्यामुळे इथे मराठीत न बोलता एका ठराविक भाषेत बोला!, अशी सक्ती कोणी करत असेल, तर ते चुकीचे आहे! भाजपाचे नाव घेऊन, असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत! आपली मुंबई सर्वांची आहे, परंतु ती सर्वात आधी मराठी माणसाची आहे, त्यामुळे असा भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी, अशी आमची इच्छा आहे. जाहीर निषेध!," अशी प्रतिक्रिया लोढा यांनी दिलीय.

13 विधानसभा मतदारसंघांमध्ये मराठी आमदार :मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी याच मुंबईत मोठा लढा उभा राहिलाय. मुंबई म्हटलं की, मराठी असं एक समीकरण होतं. मात्र, ते चित्र आज पाहायला मिळत नाही. मराठी भाषेसाठी आणि मुंबईसाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. या हुतात्म्यांच्या आठवणीत बांधण्यात आलेलं हुतात्मा स्मारक आजही मुंबईत उभं आहे. आजघडीला याच मराठी माणसांच्या मुंबईत मराठी लोकप्रतिनिधींची संख्या दिवसेंदिवस घटताना दिसून येतेय. मुंबईत एकूण 36 विधानसभा मतदारसंघ आहेत. आजमितीस या 36 पैकी 13 विधानसभा मतदारसंघांमध्ये मराठी आमदार निवडून आलेत. हीच संख्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 11 इतकी होती. यासंदर्भात आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की, "असा एखादा माणूस शहाणपणा करतो. त्यामुळे याचा बाऊ करण्याची गरज नाही. पण तरीदेखील असा एखादा शहाणा निघालाच तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अजूनही जिवंत आहे, एवढं लक्षात ठेवा, असले प्रकार यापुढे सहन केले जाणार नाहीत."

प्रत्येक राज्याची स्वतःची एक भाषा :यासंदर्भात आम्ही शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की, प्रत्येक राज्याची स्वतःची एक भाषा असते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर तुम्हीच बॅनर लावून स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेता. आता इथे भाजपाचे राज्य आहे. त्यामुळे येथे मराठी बोलायचे नाही, असं जर म्हटलं जात असेल तर या स्थितीला जबाबदार कोण? आम्हाला कोणत्याही भाषेचा किंवा कोणत्याही धर्माचा अवमान करायचा नाही. मात्र, त्या त्या राज्यात त्या त्या भाषेतच बोललं गेलं पाहिजे. मग महाराष्ट्रातच मराठी का बोलू नये? महाराष्ट्रातच मराठीचा गळा घोटला जात असेल तर मराठीचे मारेकरी हे नव्याने आलेले सरकार आहे, असे आम्ही का म्हणू नये, असा सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केलाय.

हेही वाचा-

  1. देवेंद्र फडणवीसांच्या नावावर आज होणार शिक्कामोर्तब ? केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारामण मुंबईत दाखल
  2. महायुतीचा मुख्यमंत्री ठरेना! मुंबई दौऱ्यापूर्वी विजय रुपाणी काय म्हणाले?
Last Updated : 16 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details