नागपूर Raj Thackeray Slams MVA Leaders : सध्या राज्यात महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात वाढ होत आहे. मात्र हा प्रकार राज्यात थांबला पाहिजे, त्यासाठी केंद्र सरकारनं कठोर कायदा करण्याची गरज आहे. आता आंदोलन करणाऱ्यांच्या काळातही महिला अत्याचार होत होतेच. मात्र आता निवडणुका आल्या म्हणून विरोधक राजकारण करुन महाराष्ट्र बंदचं आंदोलन करतात का, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नागपुरात पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
दिवाळीनंतर लागतील विधानसभा निवडणुका :दिवाळीनंतर विधानसभा निवडणुका लागतील, असं वाटतं आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका रेंगाळल्या आहेत. त्यामुळे आमच्यासाठी वातावरण पोषक आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला ज्याप्रमाणं मतदान झालं, तसंच आता होईल, असं नाही. महाविकास आघाडीला शरद पवार, उद्धव ठाकरे यांना झालेल्या मतदानाबाबत समजून घेण्याची गरज आहे. मुस्लिम समाजानं भाजपा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात मतदान झालं, असंही मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.