मुंबई :विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठी घोषणा केली असून, राज्य सरकारने मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोलनाक्यांवरील हलक्या मोटार वाहनांसाठी संपूर्ण टोल माफ केलाय. आज रात्री 12 वाजल्यापासून हा नियम लागू होणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच महायुती सरकारनं केलेली ही मोठी घोषणा मानली जातेय. राज्यातील टोलनाके बंद व्हावेत, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वेळोवेळी आंदोलन करण्यात आलीत. आता राज्य सरकारच्या निर्णयानंतर राज ठाकरे यांनीदेखील सोशल मीडिया पोस्टद्वारे सरकारचे आभार मानलेत.
हलक्या वाहनांना टोलमुक्ती मिळणार :आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये राज ठाकरेंनी म्हटलंय की, मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोलनाक्यांवर आज मध्यरात्रीपासून हलक्या वाहनांना टोलमुक्ती मिळणार आहे. याबद्दल एमएमआर परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांचे अभिनंदन आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांचा खूप खूप अभिनंदन. टोलच्या व्यवहारात पारदर्शकता हवी आणि जिथे रस्त्याच्या कामांचे पैसे वसूल झालेत, तिथले रस्ते टोलमुक्त झाले पाहिजेत, या मागणीसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड संघर्ष केला. आम्ही टोलनाक्यांची तोडफोड केली यावरून आमच्यावर टीका झाली, पण सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो, त्यांना टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही," असंही राज ठाकरे म्हणालेत.
टोलच्या या खेळात संपत्तीच्या राशी उभ्या: पुढे राज ठाकरे लिहितात की, "पण असो... किमान मुंबईकर टोलमुक्त झाला आणि आमच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलं ही आनंदाची बाब आहे. यासाठी राज्य सरकारचं मी अभिनंदन करेन, पण फक्त हा निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला हवी. आज मुंबई टोलमुक्त झाली, पण त्या आधी किती लोकांनी टोलच्या या खेळात, संपत्तीच्या राशी उभ्या केल्या, याचा हिशेबच नाही. खरं तर याची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. पण ती होईल याची फारशी खात्री नाही, कारण कोणी कोणाला पकडायचं हा प्रश्न आहे. पण ठीक आहे, मुंबईकर टोलच्या ओझ्यातून मुक्त झाले हे बरे झाले."