मुंबई Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांसाठी 14 जून हा एक उत्सवाचा दिवस असतो. कारण, या दिवशी राज ठाकरे यांचा वाढदिवस असतो. राज ठाकरे यांचा वाढदिवस त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते दरवर्षी एखाद्या उत्सवाप्रमाणं दादरच्या शिवाजी पार्क इथं साजरा करत असतात. शिवाजी पार्क येथील राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दरवर्षी कार्यकर्त्यांची रेलचल असते. हार, पुष्पगुच्छ, केक, भेटवस्तू असं बरंच काही हे कार्यकर्ते आपल्या लाडक्या नेत्यासाठी घेऊन येत असतात. मात्र, यावर्षी राज ठाकरे यांनी कोणीही हार, पुष्पगुच्छ, भेटवस्तू, मिठाई घेऊन येऊ नये, असं आवाहन केलंय.
राज्यभरातून येतात कार्यकर्ते : राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचं नाव आहे. राज ठाकरेंना मानणारा त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळं राज ठाकरे यांच्या एका आवाजावर मनसेचे कार्यकर्ते काहीही करण्यास तयार होतात. अशीच काहीशी परिस्थिती त्यांच्या वाढदिवसाला देखील असते. आपल्या नेत्यावरील प्रेमासाठी मनसेचे कार्यकर्ते देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत येत असतात. संपूर्ण दिवसभर रांगेत उभं राहून हे कार्यकर्ते, राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देता येतील या आशेवर असतात. त्यात काहींना शुभेच्छा देणं शक्य होतं तर काहींना शक्य होत नाही. यावर्षी मात्र राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसाठी विशेष वेळ राखून ठेवला असून कार्यकर्त्यांना या वेळेत शुभेच्छा देता येणार आहेत.