आमदार रोहित पवार त्यांना होणाऱ्या अटकेच्या शक्यतेविषयी सांगताना पुणेMLA Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांनी पत्रपरिषदेत महायुतीवर ताशेरे ओढले. यांच्या बारामती अॅग्रो कंपनीला चालवण्यासाठी देण्यात आलेला कन्नड सहकारी साखर कारखान्यावर ईडीने जप्तीची नोटीस दिली आहे. नोटीस सिम्बॉलिक असून कारखाना चालूच राहणार आहे. कामगार, शेतकरी आणि कुणीही घाबरून जाऊ नये, असं रोहित पवार म्हणाले आहेत. अशाच नोटीस भाजपा आणि शिंदे गटात गेलेल्या नेत्यांनासुद्धा आलेल्या आहेत; परंतु मी लढत आहे, संघर्ष यात्रा काढत आहे. मी झुकत नाही आणि झुकणारही नाही. मी अटक व्हायलासुद्धा तयार आहे. त्यामुळे यामध्ये माझा कुठलाही भ्रष्टाचार नाही. मला ईडीने दिलेली नोटीस अजून मिळालेली नाही; परंतु ईडीच्या अधिकृत एक्स या हँडल वरून ही नोटीस आलेली आहे, असंसुद्धा रोहित पवार म्हणाले आहेत.
अटकेला घाबरत नाही :"लोकसभा निवडणुका येत आहेत. मी कुठेही फिरू नये आणि प्रचार करू नये, यासाठी मला पुढच्या दोन-तीन महिन्यात अटक करण्याची शक्यता आहे. पण, मी घाबरणार नाही. आमच्याकडेही महायुतीतील काही नेत्यांच्या भ्रष्टाचारांच्या फाईल्स आलेल्या आहेत. ज्यांची नावे आहेत त्याचं काय करायचं तेही आम्ही पाहू", असा इशारासुद्धा रोहित पवारांनी दिला आहे.
फाईल्सबद्दल काय म्हणाले रोहित पवार? :राज्यातील सत्ताधारी नेत्यांकडून ह्या फाईल्स आल्या असतील; कारण या कुठल्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून आलेल्या नाहीत. त्यातला डेटा जो आहे तो सगळा सरकारी आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षातीलच लोक या फाईल्स माझ्या ऑफिसपर्यंत पोहोचवत आहेत. त्यात ॲम्बुलन्स घोटाळ्याची फाईल आहे. काही कंपन्यांच्या फाईल आहे तर काही आर्थिक गैरव्यवहाराच्या फाईल्स आहेत आणि त्या नेत्यांची नावेसुद्धा आहेत. त्याचाही विचार आपण करू. त्यामुळे आम्हीही आता त्या फायली बाहेर काढणार असल्याचा इशारा रोहित पवार यांनी दिला.
ही सूडबुद्धीनं केलेली कार्यवाही :"या सगळ्या चौकशीतून मी निर्दोष सुटेन. यात कुठलीही कार्यवाही होणार नाही; परंतु लोकसभेच्या निवडणुकीवर ही राजकीय सूडबुद्धीनं केलेली कार्यवाही आहे. मी घाबरत नाही, मी लढत राहीन. आता जनतेनंसुद्धा लढत राहिलं पाहिजे. सगळेच पळून गेले तर लढायचे कोणी? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळेच मी लढणार", अशी प्रतिक्रिया आज रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.
हेही वाचा :
- ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मोठा धक्का; खासदारानं धरला काँग्रेसचा 'हात'
- मराठा समाज थेट पंतप्रधान मोदींविरोधात उमेदवार देणार; बैठकीत ठराव मंजूर
- अखेर रवींद्र वायकरांचा मुहूर्त ठरला, आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार?