ठाणे21 Newborns Died:ठाणे जिल्ह्यातील कळवा येथील शासकीय छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात गेल्या महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. याच रुग्णालयात डिसेंबर 2023 मध्ये 24 तासांत 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2023 मध्ये हॉस्पिटलला भेट देऊन परिस्थिती सुधारण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतर या रुग्णालयात फारसा बदल झालेला नाही. रुग्णालयाचे डीन डॉ. राकेश बारोट यांनी 21 मृत्यूची पुष्टी केली.
बालकांच्या मृत्यूला अधिष्ठाता जबाबदार : छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तब्बल 21 नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरण समोर आलं होतं. याआधी देखील 20 ते 28 रुग्ण दगावल्याची धक्कादायक बाब याच रुग्णालयात घडली आहे. त्यावरून राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात अशा घटनाला कारणीभूत रुग्णालयाचं अधिष्ठाता बारोट तसंच डॉक्टर माळगावकर असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. "प्रत्येक जण सिरीयस होतो, तेव्हाच डॉक्टरांकडं जातो. बागेत फिरण्यासारखा कोणताही रुग्ण रुग्णालयात येत नाही", अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.
डॉक्टरांचं दुर्लक्ष?: ठाणे जिल्हा रुग्णालयाचं नूतनीकरणाचं काम सुरू असून हे रुग्णालय मनोरुग्णालयाच्या बाजूला हलवण्यात आलं आहे. त्यामुळं ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना हे रुग्णालय प्रवासाच्या दृष्टीने लांब पडतं. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हे सद्यस्थितीत महत्त्वाचे रुग्णालय मानलं जातं. मात्र कर्मचाऱ्यांची कमतरता, असुविधा, डॉक्टरांचे दुर्लक्ष या सगळ्या बाबींमुळं हे रुग्णालय चर्चेचा विषय ठरलं आहे.
रुग्णालयात सुविधा नसल्याची ओरड :ऑगस्ट 2023 रोजी एकाच दिवसात 18 रुग्ण दगावल्याची घटना येथे घडली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयाला भेट देत रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना रुग्णालयात सुविधा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र अद्यापही रुग्णालयात सुविधा नसल्याची ओरड रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. रुग्णालयावर मोठा भार पडत असून भिवंडी, मुरबाड, शहापूर कल्याण आदी भागात एनआयसीयुची सोय नसल्यानं नवजात बालक अत्यावस्थ होऊनच येथे येतात. मात्र तत्काळ उपचार मिळत नसल्यानं त्यांच्यावर उपचार करणं कठीण असतं. त्यामुळेच रुग्ण दगावण्याच्या घटना घडतात असं डॉक्टर राकेश बारोट यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात केवळ 30 एनआयसीयू खाटा असून त्यातील 20 खाटा रुग्णालयातील रुग्णांसाठी, तर 10 बाहेरून आलेल्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.