महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ड्रायव्हर गाडी चालवत होता हे दर्शवण्याचा प्रयत्न, पण गाडी अल्पवयीन मुलानेच चालवली - पुणे पोलीस आयुक्त - Pune Hit And Run Case Update

Pune Hit And Run Case Update : पुणे येथील हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन तरुणाबाबत नवीन तथ्य समोर आलं आहे. अपघातानंतर ड्रायव्हर गाडी चालवत होता हे दर्शवण्याचा प्रयत्न केला गेला होता; पण तोच अल्पवयीन तरुण गाडी चालवत होता हे स्पष्ट आहे. तसंच अपघातानंतर येरवडा पोलीस स्टेशन मधील काही कर्मचारी अधिकारी दोषी असल्याचं प्रथमदर्शनी आढळून आलं आहे.

Pune Hit And Run Case Update
पुणे पोलीस आयुक्त (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 24, 2024, 5:31 PM IST

Updated : May 24, 2024, 5:53 PM IST

पुणे Pune Hit And Run Case Update:पुण्यातील कल्याणीनगर येथील हिट अँड रन प्रकरणात त्या अल्पवयीन तरुणाच्या बाबतीत अनेक व्हिडिओ तसंच अनेक मुद्दे समोर येत आहेत. अपघात झाल्यावर तो अल्पवयीन तरुण गाडी चालवत नव्हता, असं सांगितलं जात होतं. तर येरवडा पोलीस स्टेशन येथे देखील पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांनी पैश्यांचा व्यवहार केल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. याबाबत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना विचारलं असता ते म्हणाले की, त्या अपघातानंतर ड्रायव्हर गाडी चालवत होता हे दर्शवण्याचा प्रयत्न केला गेला होता; पण तोच अल्पवयीन तरुण गाडी चालवत होता हे स्पष्ट आहे. तसंच अपघातानंतर येरवडा पोलीस स्टेशन मधील काही कर्मचारी अधिकारी दोषी असल्याचं प्रथमदर्शनी आढळून आलं आहे. त्या कर्मचारी तसंच अधिकारी यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात येणार असल्याचं यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं.

पुण्यातील हिट अँड रन केस प्रकरणावर बोलताना पोलीस आयुक्त (Reporter)

तिघांना न्यायालयीन कोठडी :अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवाल आणि पब मालक आणि मॅनेजर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सुरुवातीला या तिघांनाही तीन दिवसांसाठी पोलीस कोठडी दिली होती. ही कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. आता या तिघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.

तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम सुरू :पुणे पोलीस आयुक्त येथे कल्याणी नगर येथील हिट अँड रन प्रकरणावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, रविवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घटना घडली होती. त्यावेळी ३०४ अ हे कलम लावण्यात आलं होतं. या अपघाताचे गांभीर्य लक्षात आल्यावर ११.३० वाजता सदोष मनुष्यवधाचं कलम वाढवण्यात आलं. आम्ही बाल हक्क न्यायालयाकडे तेव्हाच सज्ञान म्हणून कारवाई करण्याची परवानगी मागितली होती. तसंच या प्रक्रियेला वेळ लागेल. तोपर्यंत या आरोपीला सुधारगृहात ठेवण्याची विनंती केली होती. ते अर्ज फेटाळण्यात आले आणि आता परत आम्ही रिव्ह्यू केला तेव्हा पंधरा दिवस सुधारगृहात ठेवायला परवानगी देण्यात आली. बालहक्क कायद्यानुसार अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना आणि पबचालकांवर कारवाई केली आणि त्यांना अटक केली असून केस भक्कम करण्यासाठी तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम सुरू असल्याचं यावेळी कुमार म्हणाले.

ब्लड रिपोर्ट बाबत काय म्हणाले पोलीस आयुक्त :त्या अल्पवयीन मुलाच्या ब्लड रिपोर्ट बाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना विचारलं असता ते म्हणाले की, ब्लड रिपोर्ट अजूनही प्राप्त झालेला नाही. सुरुवातीला त्या अल्पवयीन मुलाचे ब्लड सँपल घेण्यात आले होते आणि ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. पुन्हा एकदा ब्लड सँपल घेऊन ते पाठवण्यात आले आहेत. फॉरेन्सिक लॅबला पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे की, दोन्ही ब्लड सॅम्पलचे डीएनए सेम आहेत की नाही याबाबत देखील आम्ही माहिती मागवली आहे. तसंच हे प्रकरण 304 ए कलम अंतर्गत नसून आम्ही 304 कलम लावलं आहे. हे का लावलं तर त्या अल्पवयीन मुलाला नॉलेज होतं की, माझ्या अशा कृत्यामुळे एखाद्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. म्हणून आम्ही 304 कलम लावलं आहे. ब्लड रिपोर्ट काहीही आला तरी या प्रकरणावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, असं यावेळी कुमार म्हणाले.


पिझ्झा पार्टीच्या आरोपीत तथ्य नाही :येरवडा पोलीस स्टेशन येथे पिझ्झा पार्टी झाली असल्याचा आरोप होत आहे. याबाबत अमितेश कुमार यांना विचारलं असता ते म्हणाले की, यात कोणतंही तथ्य नाही. परंतु काही गोष्टी आहेत ज्यांच्यावर पुढील काळात कारवाई करण्यात येईल. तो अल्पवयीन तरुण घरातून बाहेर पडल्यापासून ते अपघात होईपर्यंत सर्वच बारीक-सारीक गोष्टींवर आम्ही लक्ष ठेवून तपास करत आहोत. तपास करत असताना एक स्पष्ट झालं आहे की, घरातून बाहेर पडत असताना तो अल्पवयीन तरुणच गाडी चालवत होता आणि अपघातावेळी देखील तोच अल्पवयीन तरुण गाडी चालवत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ज्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. अश्यांवर 201 कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं यावेळी कुमार म्हणाले.

आमदार टिंगरे यांचा हस्तक्षेप नाही :काल त्या अल्पवयीन मुलाच्या संदर्भात सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. याबाबत अमितेश कुमार यांना विचारलं असता ते म्हणाले की, जो काही व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेला आहे, त्याबाबत प्राथमिक माहिती घेतली असता तो व्हिडिओ त्या मुलाचा नाही. ज्याने कोणी तो व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. तसंच अपघाताच्या रात्री आमदार सुनील टिंगरे हे पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांनी हस्तक्षेप केला असल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत कुमार म्हणाले की, हे खरं आहे की अपघाताच्या रात्री लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार आले होते; मात्र हस्तक्षेप केल्याचा जो आरोप केला जात आहे त्यात कोणतही तथ्य नसल्याचा त्यांनी सांगितलं.

हेही वाचा:

  1. पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आमदार रवींद्र धंगेकर यांचं आंदोलन - Pune Hit And Run Case
  2. मजुरीच्या पैश्याचा वाद उठला जिवावर; दोघांच्या हाणामारीत एकाचा मृत्यू, राजकीय वळण देण्याचा प्रयत्न - Nagpur
  3. अकोले दुर्घटना : मृत वीर जवानांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत जाहीर, विखे पाटलांची माहिती - SDRF Boat Accident
Last Updated : May 24, 2024, 5:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details