मुंबईMinister Uday Samant :कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा महायुतीतील भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने प्रतिष्ठेची केली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा आपला बालेकिल्ला असून या मतदारसंघातून आपल्याला तिकीट मिळालंच पाहिजे आणि आपणच उमेदवार असणार असा वारंवार दावा भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलाय. नारायण राणे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना आता पुन्हा एकदा वारं उलट्या दिशेने वाहू लागलय.
मेळावा रद्द करण्याची नामुष्की :नारायण राणे यांची उमेदवारी पक्की मानली जात असताना पुन्हा एकदा उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांनी किरण सामंत यांच्या उमेदवारीबाबत हट्ट कायम ठेवलाय. ही उमेदवारी प्रतिष्ठेची केल्यानं भाजपाला हा मतदारसंघ सोडावा लागल्याची चर्चा आहे. नारायण राणे यांच्या वाढदिवशी भाजपाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीतही राणे यांना स्थान मिळू शकलं नाही. तर गुढीपाडव्याच्या दिवशी रत्नागिरीत महायुतीने आयोजित केलेल्या मेळाव्याकडे राष्ट्रवादी अजित पवार गट तसंच उदय सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे हा मेळावाच रद्द करण्याची महायुतीवर नामुष्की ओढवली होती.
राणे आणि सामंत तणाव वाढला :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांनी अखेर डाव साधला असून किरण सामंत यांनी उमेदवारी खेचून आणली आहे, अशीच चर्चा सुरू झालीय. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आलं, असं बोललं जातय. तर दुसरीकडे नारायण राणे मात्र माघार घेण्याच्या तयारीत नाहीत. नारायण राणे यांनी जाहीरपणे निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असून यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. तर दरम्यानच्या काळात उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी व्हाट्सअप स्टेटस ठेवल्यामुळे अधिक चर्चा रंगू लागली आहे.