सातारा Lok Sabha Election Result:लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला. भाजपा नेत्यांचा अनेक जागांवर दारुण पराभव झाला. यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पराभवाची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली. अशात सातारा महायुतीच्या उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंनी मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं वक्तव्य केलं आहे.
"महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले नसून शंभूराज देसाई उभे आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांना मताधिक्याने विजयी करावे, असा प्रचार करुनसुध्दा उदयनराजेंना मताधिक्य मिळाले नाही. यावर मी कुणालाही दोष देणार नाही. इथला आमदार म्हणून मी एकटा त्याला जबाबदार आहे, असे साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंनी म्हटलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
उदयनराजेंचं घटलेलं मताधिक्य हा माझाच पराभव: पाटण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, "लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले विजयी झाले. असे असले तरी घटलेल्या मताधिक्यामुळे माझाच पराभव झाला आहे. मंत्रिपदामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात सत्ता गेली. त्यांना सुस्ती आली. त्यामुळे घटलेले मताधिक्य ही माझी जबाबदारी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मी अपेक्षाभंग केला आहे."