छत्रपती संभाजीनगर :राज्याचं मंत्रिमंडळ जाहीर झालं असलं, तरी पालकमंत्री पदाचा पेच अद्याप कायम आहे. नव्यानं झालेल्या मंत्र्यांनी आता आपल्या पक्षाच्या नेत्यांकडं फिल्डींग लावायला सुरुवात केली आहे. छ. संभाजीनगर जिल्ह्यात शिंदे गट शिवसेना आणि भाजपामध्ये स्पर्धा लागली आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि ओबीसी विभाग मंत्री अतुल सावे दोघांनीही पालकमंत्री होण्याची इच्छा व्यक्त करत दावा केलाय. त्यामुळे शिवसेनेकडं असलेलं पद भाजपाच्या पारड्यात पडणार का? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडलाय.
शिवसेना करणार पुन्हा दावा : छ. संभाजीनगर जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. आधी ठाकरे गटाची ताकद भक्कम असताना एकनाथ शिंदे यांनी बंड करत ती कमकुवत केली. आता शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडून आल्यानं शिवसेनेच्याच मात्र दुसऱ्या गटाला जनाधार मिळाल्याचं दिसून आले. पक्ष एक, शिलेदार तेच मात्र नेता दुसरा असा कौल मतदारांनी दिल्यानं मंत्रिपदाबाबत दावा अधिक भक्कम झाला. 2019 मध्ये 9 पैकी 5 तर 2024 मध्ये 6 आमदार निवडणूक जिंकल्यानं पालकमंत्री पदावर शिवसेना दावा करत आहे. मागील मंत्रिमंडळात संदीपान भुमरे यांना संधी देण्यात आली. मात्र ते आता खासदार असल्यानं अनुभवी नेता म्हणून संजय शिरसाट यांना संधी मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. इतकंच नाही तर पक्षाकडं तशी ताकद देखील त्यांनी लावली आहे.