नागपूर : शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत एका खासदाराच्या मदतीनं काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचा दावा भाजपा आमदार आणि मंत्री नितेश राणे यांनी केलाय. त्यामुळं राजकीय क्षेत्रात विविध चर्चांना उधाण आलंय. याबाबत संजय राऊत यांच्याकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. नेमकं काय म्हणाले नितेश राणे वाचा...
राऊत काँग्रेसच्या संपर्कात : "संजय राऊत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी दिल्लीतील एका नेत्याशी चर्चा करत आहेत. राऊत यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपुष्टात येत असून, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडं पुन्हा राऊतांचा विजय निश्चित करण्यासाठी पुरेसे आमदार नाहीत. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी दिल्लीत ज्या नेत्याशी चर्चा सुरू आहे त्याबद्दल राऊतांनी 'सामना'मध्ये लिहावं," असं म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊतांवर टीका केली.
'सामना'मध्ये लिहावं :संजय राऊत यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाबाबत बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, "आदित्य ठाकरेंमुळं पक्षातील नेत्यांमध्ये खदखद आहे. त्यामुळं संजय राऊत तरी पक्षात किती काळ टिकणार आहेत? हे संजय राऊत यांनीच 'सामना'मध्ये लिहावं." नितेश राणे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल केला. "उद्धव ठाकरे यांना स्वतःचा धर्म नाही, त्यांचं राजकीय धर्मांतरण झालंय." असं म्हणत मंत्री नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.