छत्रपती संभाजीनगर Pimpal Purnima 2024: कौटुंबिक समस्याग्रस्त पत्नी पिडीत पुरुष आश्रम येथे वटसावित्री पौर्णिमेच्या पूर्व संध्येला 'पिंपळ पौर्णिमा' साजरी करण्यात आली. महिला 'वट पौर्णिमा' साजरी करून वर्षानुवर्षापासून वट वृक्षाची पूजा करतात, सात फेरा मारून सात जन्मासाठी हाच पती मिळावा यासाठी पूजा अर्चा करतात. मात्र, ज्या पुरुषांच्या बायका त्याना भांडतात, त्यांच्यावर खोटे खटले दाखल करतात, अशा पत्नीसोबत याच जन्मी जगणं अशक्य असल्यानं आणखी सात जन्म नको अशी मनोकामना, पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून केल्याची माहिती, संघटनेचे अध्यक्ष भारत फुलारे यांनी दिली.
पीडित पुरुषांनी मारल्या पिंपळाच्या झाडाला फेऱ्या : शहरालगत करोडी येथे असलेल्या पत्नी पिडीत पुरुष आश्रम येथे मागील सहा वर्षांपासून ’पिंपळ पौर्णिमा’’ साजरी करून पिंपळाला साकडं घातलं जातं. ज्यांच्या पत्नीनं पतीला त्रास देऊन जगणं मुश्कील केलं, अश्या पत्नी पीडितांच्या पत्नी देखील वट वृक्षाला खोटे नाटे बोलून साकडं घालतील, तर त्यांचं ऐकू नका. अश्या पत्नी पीडितांची त्यांच्या पत्नीपासून सुटका व्हावी अशी याचना यावेळी केली जाते. पुरुषांवरील अन्याय अत्याचारात वाढ होत चालली आहे. पुरुषांच्या हक्कासाठी कुटुंबीय समस्या पुरुष संघटना स्थापन करण्यात आली. महिला अबला होत्या त्यावेळी महिलांच्या सबलीकरणासाठी वेग वेगळे कायदे बनले गेले. परंतु सदर कायदे तयार होताना पुरुषांवर अन्याय होऊन पुरुष ‘'अबला’' होतील, याचा विचारच न केल्यानं आज खऱ्या अर्थानं पुरुष हतबल झाला आहे. त्यामुळं पुरुष सबलीकरण करण्यासाठी एकतर्फी कायदे रद्द होऊन पुरुषांना देखील कायद्याचे संरक्षण मिळणं गरजेचं आहे.
पुरुषांसाठी संरक्षण कायदे करा :नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो ( N.C.R.B.) च्या नुसार जवळपास ३२.२ टक्के विवाहित पुरुषांनी वैवाहिक जाचाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. तर त्याच्या तुलनेत महिला आत्महत्या ह्या केवळ ४.८ टक्के इतक्या आहेत. एकतर्फी कायद्यामुळं आणि समाजाच्या एकतर्फी धारणेमुळं पुरुष खचून जाऊन त्याची काम करण्याची क्षमता कमी होते व परिणामी देशाचे दर डोई उत्पन्न देखील घटत चालले आहे. तसेच पवित्र विवाह पद्धत देखील धोक्यात येऊन येणारी पिढी देखील धोक्यात आहे असं मत, संघटनेचे अध्यक्ष भारत फुलारे यांनी व्यक्त केलं.