अमरावती :महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली असताना राज्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या मेळघाट विधानसभा मतदारसंघात (MELGHAT ASSEMBLY CONSTITUENCY ) राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पाच वर्षांपासून भाजपा पक्षाच्या तीन इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी केली असताना आता ऐनवेळी महायुतीच्या या जागेवर शिवसेना शिंदे गटानं दावा केल्यामुळं भाजपा गोटात खळबळ उडाली. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांना विरोध करणारे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल हे बच्चू कडू यांच्या 'प्रहार'मधून शिवसेना शिंदे गटात सामील होऊन महायुतीचा चेहरा मेळघाट विधानसभा मतदारसंघात होणार असल्यामुळे महायुतीमध्ये राजकुमार पटेल यांच्याविरुद्ध भाजपाकडून प्रचंड विरोध सुरू झाला. महायुतीमध्ये सध्या शिवसेना की भाजपा अशी मारामारी सुरू असताना महाविकास आघाडीनं मेळघाटात शांततेनं चाचपणी पूर्ण केली. महाविकास आघाडी मधील काँग्रेससाठी मेळघाट मतदार संघ सुटेल. एकूणच महायुती मधील भानगडी आणि महाआघाडीतून नेमका कोण उमेदवार निश्चित होईल याकडे सध्या मेळघाटातील मतदारांचं लक्ष लागलं आहे.
असा आहे मेळघाट विधानसभा मतदारसंघ -सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मेळघाटात बहुसंख्य आदिवासी राहतात. यामुळे मेळघाट विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा आणि धारणी या दोन तालुक्यांमध्ये मेळघाट विस्तारला असून मेळघाट विधानसभा मतदारसंघातील काही गावं ही अचलपूर तालुक्यात देखील येतात. 1962 ते 2019 पर्यंत झालेल्या विधानसभेच्या एकूण बारा निवडणुकींमध्ये मेळघाटात सातवेळा काँग्रेसनं बाजी मारली. भाजपानं या मतदारसंघात तीनवेळा झेंडा फडकवला. एकदा अपक्ष उमेदवारानं आमदारकी मिळवली तर आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे उमेदवार म्हणून 2019 मध्ये राजकुमार पटेल हे विजयी झाले.
राजकुमार पटेलांमुळे महायुतीत धुसफूस -अनेक निवडणुकांपासून मेळघाट विधानसभा मतदारसंघ हा भाजपाकडे आहे. 1995 च्या निवडणुकीत भाजपाचे पटल्या गुरुजी मावसकर हे मेघाटातून निवडून आले. विद्यमान आमदार राजकुमार पटेल हे भाजपाचे आमदार म्हणून 1999 मध्ये विजयी झालेत. 2014 च्या निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर प्रभुदास भिलावेकर यांनी मेळघाटात कमळ फुलवलं. 2019 च्या निवडणुकीत राजकुमार पटेल हे बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आलेत. 2019 पासून सलग पाच वर्षे आमदार बच्चू कडू आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्यात सतत खटके उडायचे. राजकुमार पटेल यांनी देखील नवनीत राणा यांच्या विरोधात सातत्यानं भूमिका घेतली. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्या पराभवासाठी बच्चू कडू यांच्यासोबतच राजकुमार पटेल यांनी देखील मोठी ताकद लावली. आता राजकुमार पटेल हे महायुतीतील शिवसेना शिंदे गटात सामील झाले असून शिवसेना शिंदे घटानं मेळघाटच्या जागेवर दावा केला असून राजकुमार पटेल यांना शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी मिळणार असं बोललं जातय. दरम्यान मेळघाटची जागा काहीही झालं तरी शिवसेना शिंदे गटाला सुटू नये आणि आमदार राजकुमार पटेल हे तर महायुतीचे उमेदवार मुळीच नकोत अशी स्पष्ट भूमिका जिल्ह्याच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी पक्षश्रेष्ठींकडे मांडली. मेळघाटातून भाजपाची उमेदवारी मिळावी यासाठी वर्षभरापूर्वीच काँग्रेसमधून भाजपात आलेले माजी आमदार केवलराम काळे यांच्यासह भाजपाशी एकनिष्ठ असणारे प्रभुदास भिलावेकर, ज्योती सोळंके, रेखा मावसकर हे गत अडीच तीन वर्षांपासून मतदार संघात सक्रिय आहेत. ऐनवेळी आता राजकुमार पटेल हे महायुतीचे उमेदवार असतील अशी चर्चा रंगायला लागल्यानं मेळघाटात भाजपाचे इच्छुक उमेदवार आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये चुळबुळ सुरू झाली.