मुंबई Central Railway Mega Block : मध्य रेल्वेनं रविवारी ठाणे ते दिवा आणि कुर्ला ते वाशी दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचं जाहीर केलंय. मुंबई सेंट्रल ते माहीम दरम्यान रात्रीचा ब्लॉक असल्यानं पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही. ब्लॉकच्या काळात रेल्वे मार्गावरील सिग्नलची देखभाल आणि दुरुस्तीची कामे केली जातात. त्यामुळं काही लोकल फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. तर काही लोकल आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावणार असल्याचं रेल्वेनं म्हटलंय.
'ही' ट्रेन पनवेल स्टेशनपर्यंत धावणार :याबाबत अधिक माहिती अशी की, ब्लॉक काळात अप आणि डाउन मेल-एक्सप्रेस ब्लॉक वेळेत जलद मार्गावर धावतील. रविवारच्या मेगा ब्लॉकचा परिणाम लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांवरदेखील होणार आहे. ब्लॉक काळात 19 मेल-एक्स्प्रेस गाड्यांसह काही लोकल रेल्वे उशिरानं धावणार आहेत. वसई रोड-दिवा- वसई रोड MEMU फक्त कोपरपर्यंत धावणार असल्यानं कोकणात जाणारी रत्नागिरी-दिवा पॅसेंजर ट्रेन पनवेल स्टेशनपर्यंत चालवली जाणार आहे.
लोकल फेऱ्या रद्द : मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल, बेलापूर, वाशी या हार्बर मार्गा दरम्यान अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. यावर उपाय म्हणून सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ठाणे ते वाशी/नेरूळ लोकल सुरू राहतील. ब्लॉक काळात रात्री उशिरा धावणाऱ्या लोकल अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर वळवण्यात येतील. शनिवारी मध्यरात्री ब्लॉक असल्यानं पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक नसेल.
इतक्या तासांचा जंबो ब्लॉक : दरम्यान, पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील मुंबई सेंट्रल आणि माहीम स्थानका दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी (शनिवार मध्य रात्र) सकाळी 00.15 ते पहाटे 04.15 पर्यंत चार तासांचा जम्बो ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत, सांताक्रूझ आणि चर्चगेट स्थानकांदरम्यान सर्व जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर चालवल्या जातील अशी माहिती रेल्वे विभागाच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा -
- मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक; घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा! - Mumbai Mega Block
- मध्य रेल्वेचा विशेष ब्लॉक संपला; तीन दिवसांच्या ब्लॉकमधून प्रवाशांना काय मिळालं? - Central Railway Block Ends
- मुंबईला जाताय तर थांबा! 'ही' बातमी न वाचता मुंबईला जाण्याचं नियोजन केल्यास होऊ शकते अडचण - Mega Block