महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भंडारा हादरलं! स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत स्फोट; आठ जणांचा मृत्यू, 5 जखमी - EXPLOSION IN ORDNANCE FACTORY

भंडाऱ्यातील स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यात 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मंत्री नितीन गडकरी यांनी दिली होती.

Massive explosion in ordnance manufacturing company in Bhandara district
भंडाऱ्यात स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत स्फोट (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 24, 2025, 1:03 PM IST

Updated : Jan 24, 2025, 9:39 PM IST

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण स्फोट झालाय. यात आठ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनानं दिली. सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास LTCE 23 या इमारतीमध्ये स्फोट झाले. त्यामुळं इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. सकाळी इमारतीमध्ये पहिल्या शिफ्टचे लोक काम करत असताना हा स्फोट झाला. दरम्यान या घटनेत 8 जण ठार झाल्याची भीती सुरुवातीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली होती. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.

स्फोटाची तीव्रता मोठी :स्फोटाची तीव्रता इतकी होती की या स्फोटामुळं दहा किलोमीटर अंतरापर्यंत घरांना हादरे बसलेत. या कंपनीत दारुगोळा निर्मितीचे कार्य होत होते. या स्फोटात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

भंडारा स्फोट आणि मदतकार्य (बातमीदार)

मोठा स्फोट झाल्याचा आवाज : एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की, "मी कामावर जात होतो आणि मला हवेत ढिगारा उडताना दिसला. त्यातील एक तुकडा माझ्या जवळ आला, ते पाहून मी जोरात पळालो. त्यानंतर त्या परिसरातून मला आग आणि धूर बाहेर येताना दिसला. खूप मोठा स्फोट झाल्याचा आवाज मला आला. संपूर्ण इमारत उडाली असल्यासारखं मला जाणवलं."

ऑर्डनन्स फॅक्टरीत झालेल्या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सुरुवातीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पीटीआयला दिलीय. “प्राथमिक माहितीनुसार, स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला आणि सात जण जखमी झाले,” असे गडकरी यांनी पत्रकारांना सांगितलं. जिल्हा प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितले की, स्फोटामुळे युनिटचं छत कोसळलं. घटनास्थळी शोध आणि बचाव कार्य सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी सांगितलं होते की, १३ ते १४ कामगार घटनास्थळी अडकले आहेत.

पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मते, सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास जवाहर नगर परिसरातील ऑर्डनन्स फॅक्टरीच्या एलटीपी विभागात स्फोट झाला. जिल्हाधिकारी संजय कोलते म्हणाले की, घटनेच्या वेळी युनिटमध्ये १३ ते १४ लोक काम करत होते. त्यांनी सांगितलं की, सहा जणांना बाहेर काढण्यात आलं आणि त्यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर इतरांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत 8 लोकांचा मृत्यू झाला असून, 5 लोक जखमी आहेत.

मृतांची नावे :

1) चंद्रशेखर गोस्वामी 59 वर्षे

2) मनोज मेश्राम 55 वर्षे

3) अजय नागदेवे 51 वर्षे

4) अंकित बारई 20 वर्षे

5) लक्ष्मण केलवडे वय अंदाजे 38

6) अभिषेक चौरसिया वय 35

7) धर्मा रंगारी वय 35 वर्ष

8) संजय कारेमोरे,

जखमीची नावे :

1) एन पी वंजारी 55 वर्षे

2) संजय राऊत 51 वर्ष

3) राजेश बडवाईक 33 वर्षे

4) सुनील कुमार यादव 24 वर्षे

5) जयदीप बॅनर्जी 42 वर्षे

मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल :यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला माहिती दिली होती. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, "भंडारा जिल्ह्यातील ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील स्फोटाच्या घटनेत छत कोसळून 13 ते 14 कामगार अडकल्याचं वृत्त आहे. त्यातील 5 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे घटनास्थळी असून सर्व प्रकारची मदत पुरवण्यात येत आहे. बचाव कार्यासाठी एसडीआरएफ तसेच नागपूर महापालिकेची चमू सुद्धा पाचारण करण्यात आल्या असून त्या लवकरच पोहोचतील. संरक्षण दलासोबत जिल्हा प्रशासन समन्वयाने मदत कार्यात सहभागी आहे. वैद्यकीय मदतीसाठी सुद्धा चमू सज्ज ठेवल्या आहेत. आतापर्यंत प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत दुर्दैवाने एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो."

हेही वाचा -

  1. परफ्यूमवरील तारखा बदलताना बाटल्यांचा स्फोट; एकाच कुटुंबातील 4 जण गंभीर जखमी
  2. ड्रग्ज कंपनीत भीषण स्फोट ; आगीत आजूबाजूच्या कंपन्या जळून खाक, प्लांट ऑपरेटर गंभीर
  3. रेडिको कंपनीत टाकी फुटल्यानं चौघांचा मृत्यू, कंपनीची माहिती देण्यास टाळाटाळ
Last Updated : Jan 24, 2025, 9:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details