पुणे : "मराठा आरक्षणाचं खरे मारेकरी शरद पवार आहेत. येत्या 23 मार्चला शरद पवार यांच्या बारामतीतील घरांवर मोर्चा काढणार आहोत," अशी माहिती प्राध्यापक आणि लेखक नामदेव जाधव यांनी दिली आहे. शरद पवार यांच्या विरोधात मराठा आरक्षणावर बोलल्यानं नामदेव जाधव यांच्यावर शाई फेकण्यात आली होती. त्यानंतर नामदेव जाधव हे आता पुन्हा एकदा शरद पवारांविरुद्ध आक्रमक झाले आहेत. "रायगडावर जाऊन शरद पवारांनी रायगड अपवित्र केला. हा गड पवित्र करण्याचं काम आम्ही करणार आहोत," जाधव म्हणाले आहेत.
विचाराची लढाई विचारानं लढायला पाहिजे : जीआर काढला, त्याच वेळेस पत्रकार परिषद घेऊन ही माहिती मी दिली होती. परंतु, त्यावेळेस याच परिसरात माझ्यावर हल्ला झाला. विचारांची लढाई विचारानं लढायला पाहिजे, असं आयुष्यभर तुणतुणे वाजवणाऱ्या लोकांना हातामधे शस्त्र घेण्याची आणि हल्ला करण्याची गरज भासली. कारण या संपूर्ण गटातले, आंदोलनातले खरे सूत्रधार कोण आहेत? हे या जीआरमुळे उघड झालं असंही जाधव म्हणाले. "मनोज जरांगे हे सर्व व्यक्तीबद्दल बोलतात. फक्त एकाच व्यक्तीबद्दल आणि एकाच पक्षाबद्दल ते बोलत नाहीत," अस म्हणत जाधव यांनी जरांगे यांच्यावर टीका केली.
आरक्षणावर बोलण्याचं टाळतात : "सुरुवातीपासून जरांगे हे शरद पवार यांच्यावर बोलणं टाळत होते. तसा संशय होता. त्यामुळे लोकांचं लक्ष होते. याच्यामागे कोणीतरी बोलवता धनी आहे, असं लोक आता म्हणत आहेत. काल मुख्यमंत्रीही नेमकं तेचं बोलले आहेत. महाराष्ट्र अस्थिर करण्यामध्ये कायम एकच व्यक्तीचा हात असतो. ते शरद पवार असतात, असा गंभीर आरोप जाधव यांनी यावेळी केला. जेव्हा-जेव्हा शरद पवार सत्तेच्या बाहेर जातात, तेव्हा ते मराठ्यांना उचकवतात. सत्तेत आलं की हातावर तुरी देतात. आरक्षणावर बोलण्याचं टाळतात. हे त्यांनी गेली 40 वर्षे केलं आहे," असंही जाधव यावेळी म्हणाले.
23 मार्चला सरळ बारामतीमध्ये धडकायचं : " पवार हे चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. कधीही मराठा आरक्षणावर 'ब्र' काढला नाही. (2010) मध्ये कायद्यानं मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही, असं शरद पवार यांचं वक्तव्य असल्याची बातमी आहे. आरक्षण घालवायलाही शरद पवार जबाबदार आहेत. आरक्षण न मिळायलाही शरद पवारच जबाबदार आहेत," असा घणाघातही जाधव यांनी केला आहे. "त्यामुळे मराठ्यांनी आपली ऊर्जा इकडे तिकडे वाया न घालवता 23 मार्चला सरळ बारामतीमध्ये धडकायचं आहे," असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं आहे.
बोलण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही : मनोज जरांगे फडवणीस यांच्यामुळे आम्हाला आरक्षण भेटत नाही, असं म्हणत आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना यापूर्वी मनोज जरांगेंची कधीकाळी पाठराखण करणारे नामदेव जाधव यांनी फटकारलं आहे. "त्यांनी कधी काय बोलावं, हा मनोज जरांगे यांचा प्रश्न आहे. त्यांची भूमिका घेण्यासाठी मी आलो नाही. मी त्यांची बाजू मांडली नाही. मी मराठा आरक्षणावर भूमिका मांडली. त्यांच्या जागी दुसरा कोणी असता तर त्यांची ही भूमिका मी आरक्षणावरच मांडली असती. तसंच, माझी भूमिका दूषित नाही, हे खरं वास्तव आहे. ते बोलण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही," असंही ते म्हणाले आहेत.