नागपूर Maratha Reservation Issue :मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात आज अतिशय चांगला मार्ग निघाला. आंदोलनाची सांगता झाली याचा मला आनंद आहे. (Manoj Jarange Patil) मनोज जरांगे यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांनी हा मार्ग स्वीकारला, यासाठी आभार मानतो. कायद्याच्या आणि संविधानाच्या कक्षेतच आरक्षणाचा प्रश्न सोडवावा लागेल हे आम्ही प्रारंभीपासून सांगत होतो, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. ते नागपुरात बोलत होते.
ओबीसी समाजाची भीती दूर झाली :आंदोलनाबाबत मुख्यमंत्री आणि सरकार कायमचं सकारात्मकच होते. या नव्या पद्धतीमुळे मराठा समाजाचा मोठा प्रश्न सुटणार आहे. ओबीसी बांधवांच्या मनात भीती होती, तसा कुठलाही अन्याय यामुळे होणार नाही. ओबीसींवर अन्याय होईल, असा निर्णय राज्य सरकारनं घेतला नाही, हे मी छगन भुजबळ यांना स्पष्ट करू इच्छितो. ज्यांच्या नोंदी नाहीत किंवा पुरावे नाहीत त्यांना प्रमाणपत्र देण्याचा विषय नव्हता. पण, ज्यांच्या नोंदी आहेत आणि कायदेशीर अधिकार असताना प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत होत्या, त्यांना ते मिळण्याचा मार्ग यातून मोकळा केला आहे. त्याची पद्धत सोपी केली आहे. राज्यातील सगळ्या समाजाला न्याय मिळवून देण्यात आला आहे.