नागपूरPoisoning To Civilians: उपवासामध्ये शिंगाड्याचं पीठ खाणाऱ्या काही लोकांना विषबाधा झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नागपूर शहराच्या लगत असलेल्या हिंगणा आणि कामठी या दोन तालुक्यात शेकडो नागरिकांना शिंगाड्याचं पीठ खाल्यानं विषबाधा झाली आहे.
उलटी आणि थंडीचा त्रास :फराळासाठी शिंगाड्याच्या पिठाचे रेडीमेड पाकेट वापरण्यात आले होते. फराळ केल्यानंतर काही लोकांना उलटीचा त्रास सुरू झाला तर काहींना थंडी वाजून हुडहुडी भरली होती. उपवासाच्या अन्नातून विषबाधा झालेल्या लोकांची संख्या ही सतत वाढत असल्यानं अनेकांना उपचारासाठी हिंगण्याच्या शालीनीताई मेघे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये जितेंद्र मिश्रा, सीमा मिश्रा, मुलगी जान्हवी मिश्रा, शाश्वत मिश्रा यांचा समावेश आहे. तर किन्ही (धानोली) या गावातील ज्ञानेश्वर निघोट, श्रेया निघोट, आर्यन निघोट यासह खैरी पन्नासे येथील दिलीप खोंडे, त्यांचे वडील लहानुजी खोंडे आणि शेजारी नरेंद्र वाटकर यांचा समावेश आहे.
फराळातून झाली विषबाधा : वानाडोंगरी येथील भाविकांनी दुकानातून शिंगाडा पीठचे पॅकेट आणून त्यापासून थालीपीठ बनवून खाल्ले होते. तर किन्ही येथील निघोट आणि खैरी येथील खोंडे यांच्याकडे हिंगणा येथील एका हॉटेलमधून फराळी शेवचिवडा आणला होता. हे खाऊन तब्येत बिघडल्यानंतर ११ रुग्णांना रात्रीला नजीकच्या शालीनताई रुग्णालयात भरती करण्यात आले. आता त्यांची प्रकृती सुधारली आहे. अनेक जण नागपूर येथे खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत.
रुग्णालयाकडून मोफत उपचार : या घटनेची माहिती मिळताच आमदार समीर मेघे यांनी शालिनीताई हॉस्पिटलचे अधिष्ठाता वसंत गावंडे यांच्याशी संपर्क साधला आणि रुग्णांची विचारपूस केली. तसेच या सर्व रुग्णांवर सर्व उपचार मोफत करण्याचे निर्देश दिले आहेत.
भगरीतून विषबाधा : बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सोमठाणा येथे फेब्रुवारी, 2024 रोजी भागवत सप्ताह सुरू होता. येथे भाविकांना भगरीतून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला होता. दरम्यान मंगळवारी एकादशी असल्यानं रात्री भाविकांना भगरचा भात आणि शेंगदाणा आमटी फराळ म्हणून देण्यात आला होता. हा प्रसाद खाल्लानंतर रात्री अनेकांना उलट्या सुरू झाल्या. यात सोमठाणा खापरखेड आणि आजूबाजूच्या गावातील भक्तांना विषबाधा झालीय. एकूण २०० भाविकांवर बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होता. तर अनेकांना इतरत्र उपचारार्थ हलवण्यात आलं. तर विषबाधित रुग्णांची नावे कळू शकली नाहीत.
काय आहे नेमका प्रकार? : लोणार तालुक्यातील खापरखेड सोमठाणा येथील विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरातील फराळ खाल्ल्यानं गावातील तब्बल 300 पेक्षा जास्त भाविकांना विषबाधा झालीय. रुग्णांना मेहेकर, सुलतानपूर, लोणार, अंजनी खुर्द या ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. या घटनेनं परिसरात प्रचंड भितीचं वातावरण निर्माण झालंय. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी गैरहजर होते. त्यामुळं पोलीस आणि महसूल प्रशासनानं परिसरातील खासगी डॉक्टरांना वैद्यकीय उपचारासाठी पाचारण केलं.
हेही वाचा :
- भगरीतून विषबाधा झालेल्या रुग्णांची कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली विचारपूस
- अहमदनगरमध्ये खळबळ; हळदीच्या कार्यक्रमात दोनशेहून अधिक लोकांना विषबाधा
- बुलडाणा जिल्ह्यातील विषबाधा प्रकरणाची माहिती सादर करा, मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश