जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण मिळवण्यासाठी पुन्हा एकदा मराठा समाजानं ताकद दाखवावी, असं आवाहन मराठा समाजाला केलं आहे. मनोज जरांगे यांनी 25 जानेवारीपासून पुन्हा आंदोलन करण्याचं ठरवलं असून त्यासाठी राज्यभरातील मराठा समाजानं आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मनोज जरांगे यांनी पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढं आव्हान निर्माण झालं आहे.
प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे (ETv Bharat Reporter) 25 जानेवारीपासून आमरण उपोषण :मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. मनोज जरांगे यांनी 25 जानेवारीपासून मराठा बांधवांनी उपोषणाला यावं, असं आवाहन केलं. "आता मागे हटणार नाही, मराठा समाजानं पुन्हा एकदा आपली ताकद दाखवावी. आता आरक्षण मिळेपर्यंत माघार घेणार नाही. या आंदोलनात सरकारला भयंकर आंदोलन बघावं लागणार आहे. मराठा समाजाच्या बांधवांनी उद्यापासून बैठकीला सुरुवात करावी, मराठा मोठा आहे, हे सिद्ध करा, उद्यापासून मराठा समाजानं आंदोलनाची तयारी सुरू करावी," असं आवाहनही मनोज जरांगे यांनी केलं.
नोंदी शोधण्याचं काम बंद आहे :मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू होतं. मात्र आता सरकारनं कुणबी नोंदी शोधण्याचं काम बंद करण्यात आलं आहे, अशी माहिती मनोज जरांगे यांनी माध्यमांना दिली. याबाबत बोलताना मनोज जरांगे म्हणाले, "की मराठा समाजाच्या नोंदी शोधण्याचं काम बंद करण्यात आलं. त्यामुळं नोंदी शोधण्याचं काम सुरू करा, मराठा बांधवावरील गुन्हे मागे घ्या".
'या' तारखेपासून उपोषण : "2023 मध्ये मराठा समाजानं आपल्या आंदोलनाच्या पद्धतीत बदल केला होता. काही वर्षांपूर्वी शांततेत मोर्चे काढून सुरू झालेलं आंदोलन नंतर काहीसे हिंसक झाले. मात्र नंतर बेमुदत उपोषण सुरू झाले. त्यात अंतरवाली सराटी येथे झालेल्या पोलीस लाठीमारमुळे वेगळं वळण मिळालं आणि आंदोलन अधिक तीव्र आणि लक्षवेधी बनलं होतं. त्यातील आंदोलनाची धुरा आली ती मनोज जरांगे पाटील यांच्याकडं. आमरण उपोषणामुळं सर्वांचं लक्ष पुन्हा मराठा समाजाच्या प्रश्नांकडं वळवलं. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी 26 जानेवारी 2024 रोजी आंदोलन मागे घेण्यासाठी मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनाला एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र अद्याप त्यांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळं आता त्याच दिवशी आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं."
आंदोलनाला नवसंजीवनी देण्याची गरज : लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलनाचा परिणाम पाहायला मिळाल्यानं त्यांची तीव्रता विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळेल असं वाटत होतं. मात्र आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या भूमिकांमुळं समाज कुठेतरी भरकटत जात असल्याचं बोललं गेलं. सरकार विरोधात भूमिका घेणारा मराठा समाज महायुतीच्या बाजूनं उभा राहिला. त्यामुळं आंदोलनाची धार कमी झाली असल्याचं दिसून आलं. मात्र जानेवारी महिन्यात पुन्हा आंदोलनाची हाक दिल्यानं आता आंदोलनाला संजीवनी देण्याचं आव्हान जरांगे यांच्यापुढे आहे.
आता माघार नाही :सरकारमधील मंत्री जुनेच आहे, मात्र मुख्यमंत्री नव्यानं आले आहेत. जुन्या मुख्यमंत्र्यांना संधी दिली होती आता यांना पण द्यायला हवी म्हणून दोन महिन्यांचा वेळ दिला. मात्र 25 जानेवारी पासून मोठ्या प्रमाणात आंदोलनाला सुरुवात होईल, सर्व समाजाने आपापली कामे संपवून यावं. येताना आपले चहापाणी करण्याचं साहित्य, खाण्या-पिण्याच्या गोष्टी सोबत आणाव्यात. आता एकदा बसलं की उठायचं नाही असा निर्धार करून यावा. पुन्हा एकजुटीनं लढा उभारायचा आहे. काही झालं तरी आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. मराठ्यांच्या मतांमुळे हे निवडून आले आहेत. एकजुटीचा फायदा घेण्यासाठी अनेक जण निवडणुकीच्या काळात आले आहेत. आता समाजासाठी त्यांनी आंदोलनात यावं अन्यथा गाठ मराठ्यांशी आहे हे त्यांनी विसरता कामा नये, असा इशारा जरांगे यांनी दिलाय.
हेही वाचा :
- जरांगे पाटलांचं नव्या सरकारला आवाहन; 'सामूहिक आमरण उपोषणा'च्या तारखेची उद्या करणार घोषणा
- देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत मनोज जरांगे पाटलांचा अडथळा?
- एक महिना थांबा, मराठा काय आहेत ते कळेल! पत्रकारांवर टोलेबाजी करत मनोज जरांगे पाटील यांचा इशारा