करण गायकर यांची प्रतिक्रिया नाशिक Manoj Jarange :मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चा पुण्यात पोहचला असून मुंबईच्या दिशेनं रवाना झाला आहे. या मोर्चात लाखो मराठा बांधव सहभागी झाले आहेत. मराठा आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी पुढील पाच दिवस पुरेल, एवढी रसद नाशिकहून टेम्पोनं मुंबईला पाठवली जात आहे.
आम्ही पाच दिवस पुरेल एवढी रसद घेऊन मुंबईत जात आहोत. मराठा समाजाचे सुमारे 50 हजार सदस्य मुंबईत पोहोचले आहेत. काही वाहनं आज मुंबईत पोहोचतील. आम्ही नाशिकहून आंदोलकांना रसद घेऊन जात आहोत. यात विविध मसाले, तांदूळ, तेल, शेंगदाणे, कडधान्याचा समावेश आहे. - करण गायकर, कार्यकर्ता मराठा समाज
मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना : मराठा आरक्षणाबाबत सरकारनं अद्याप ठोस निर्णय न घेतल्यानं मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधवांचा मोर्चा पुण्यातून मुंबईच्या दिशेनं रवाना झाला आहे. या मोर्चात महाराष्ट्रभरातून लाखो मराठा बांधव सहभागी झाले आहेत. नाशिकच्या सकल मराठा समाजाच्या वतीनं लाखो मराठा बांधवांसाठी लागणारी पुरेशी रसद टेम्पोतून मुंबईला पाठवण्यात येत आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही मुंबईत ठाण मांडू, अशी भूमिका मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
घटनात्मक आरक्षण द्या :आज पुण्याजवळील पिंपरी चिंचवडमध्ये जरांगे पाटलांच्या मोर्चात हजारोंच्या संख्येनं समाज बांधव सहभागी झाले. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला टोमणे मारण्यापेक्षा घटनात्मक आरक्षण द्यावं, अशी आमची मागणी आहे. आम्हाला कुणबी प्रमाणपत्र तसंच ओबीसीतून आरक्षण हवं आहे. मुंबई मराठ्यांची आहे, त्यांना कोणीही हाकलून देऊ शकत नाही. गुंडगिरी न करता मराठ्यांचे प्रश्न सोडवण्याची सरकारला विनंती आहे. आज हजारो समाज बांधव नाशिकहून पुण्याकडं रवाना होत असून दोन दिवसात आणखी लोक मुंबईत येतील, असं मराठा समाजाचे नेते करण गायकर यांनी म्हटलंय.
हेही वाचा -
- पुण्यात मनोज जरांगे यांच्या पायी मोर्चाला तुफान गर्दी, आरक्षणासाठी जरांगे यांची मुंबईकडं कूच
- मनोज जरांगे मनुवादी, त्यांचं आंदोलन फडणवीस आणि आरएसएसने प्रभावित; पद्मश्री लेखक लक्ष्मण माने यांची टीका
- टाइम्स स्क्वेअरवर झळकावलं मराठा आंदोलनाचं बॅनर, जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अमेरिकेतून पाठिंबा