जालना Maratha Reservation Row : मराठा आरक्षणासंदर्भात सरकार ठोस भूमिका घेत नसल्यानं आज अखेर सरकारला दिलेला इशारा मनोज जरांगे यांनी पूर्ण केला. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं सकाळी साडेदहा वाजता पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आज सुरू केलेल्या आंदोलनात मनोज जरांगे यांनी अन्न पाणी आणि उपचारही घेणार नसल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे.
काय आहेत मनोज जरांगे यांच्या नवीन मागण्या :"सरकारनं विशेष अधिवेशन बोलवून या सत्रामध्ये मराठा आरक्षणाचा कायदा पारित करावा. आंदोलनादरम्यान आंतरवाली सराटीसह राज्यभरात मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे तात्काळ परत घ्यावे, माझ्या उपोषणादरम्यान मला राज्य मंत्रिमंडळातले सहा ते सात मंत्री भेटण्यासाठी आले होते. माझं उपोषण ज्यावेळी त्यांनी सोडलं, त्यावेळी त्यांनी मला शब्द दिला होता की राज्यातील मराठा आंदोलनाच्या वेळी दाखल झालेले सर्व गुन्हे आम्ही तात्काळ मागं घेऊ, पण अद्यापपर्यंत ते गुन्हे सुद्धा मागं घेण्यात आले नाहीत. राज्यात 57 लाख नोंदी सापडल्या आहेत, त्या मराठा बांधवांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र सरकारनं द्यावी."
समाजासाठी छगन भुजबळांचं काय योगदान आहे :मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली. मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी छगन भुजबळ यांना धोका असल्याची माहिती दिली आहे. छगन भुजबळ यांना एक निनावी पत्र आलं असून त्यामध्ये त्यांना धमकवण्यात आलं आहे. त्या दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांना पोलीस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे. यावर बोलताना मनोज जरांगे यांनी "छगन भुजबळ यांना कोण मारणार ? छगन भुजबळ यांचं समाजासाठी काय योगदान आहे. ते आता म्हातारे झालेले आहेत," अशा शब्दात मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली.