जालना Manoj Jarange Patil :मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटीलांनी गेल्या आठवड्यात अंतरवाली सराटीत पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली होती. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानं आज सकाळी मनोज जरांगेंच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला होता. त्यामुळं अंतरवाली सराटीततील मराठा आंदोलकांची चिंता वाढली होती. तसंच त्यांची अवस्था बघून याठिकाणी असणाऱ्या अनेक महिलांनी रडारड सुरू केली होती. तसंच उपोषणस्थळी मराठा बांधवांनी गर्दी केली होती.
उपस्थितांच्या विनंतीनंतर उपचार घेण्यास राजी : आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटलांची कालपासून प्रकृती ढासळण्यास सुरुवात झाली होती. या पार्श्वभूमीवर खासगी डॉक्टरांचं एक पथक आंदोलनस्थळी दाखल झालं होतं. यात छत्रपती संभाजीनगरात जरांगेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा समावेश होता. या डॉक्टरांनी आज सकाळी मनोज जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती केली होती. मात्र, जरांगेंनी डॉक्टरांना माघारी पाठवलं होतं. अखेर मराठा समाजाच्या विनंतीनंतर तसंच नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी समजावल्यानंतर मनोज जरांगे पाटील वैद्यकीय उपचार घेण्यास तयार झाले आहेत. त्यानंतर जरांगे पाटलांना डाॅक्टरांनी सलाईन लावून उपचार सुरू केले. मात्र, यावेळी जरांगे पाटलांना अश्रु अनावर झाले होते.