महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मनोज जरांगे पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं राजकीय समीकरण बदलणार? - Manoj Jarange - MANOJ JARANGE

Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व करणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील आज 7 ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. जरांगे यांच्या दौऱ्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला मंगळवारी केलेल्या वक्तव्याची पार्श्वभूमी आह. आरक्षण मिळत नसेल तर सत्तेत जाण्याशिवाय पर्याय नसल्याचं वक्तव्य करत मनोज जरांगे यांनी सक्रिय राजकारण प्रवेशाचं सूतोवाच केलं होतं.

Manoj Jarange
मनोज जरांगे (Etv Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 7, 2024, 4:31 PM IST

मुंबईManoj Jarange :मराठा आरक्षणासाठी एक वर्षापासून लढा सुरू असूनही मराठा आरक्षण मिळत नसेल, तर सत्तेत जाण्याशिवाय पर्याय नाही, असं ठाम मत मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या वक्तव्यानं सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचं धाबं दणाणलं आहे. जरांगे यांनी स्वतःची उक्ती जर कृतीत आणली तर राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी अशी राजकीय लढाई सुरू असताना त्यांचा निर्णय विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांसाठी हानिकारक ठरू शकतो.

निवडणुकीच्या रिंगणात उतरणार : गेल्या एका वर्षापासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांना सरकारकडून आश्वासन देण्यात येत आहेत. पण ती पूर्ण होत नसल्याचा जरांगे यांचा आरोप आहे. म्हणूनच आता त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय जाहीर करत वातावरण तापतं ठेवलं आहे. त्यांनी बुधवार, 7 ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. 'शांतता संवाद यात्रे'द्वारे ते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. आतापर्यंत त्यांनी काढलेल्या शांतता रॅलीला मोठ्या प्रमाणात जनतेकडून प्रतिसाद मिळाला आहे. आता न्याय्य हक्कासाठी जनता घरात बसणार नाही, यापुढंही असाच प्रतिसाद शांतता रॅलीला मिळत राहील, असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

"मराठ्यांचं वाटोळ करणारं सरकार" : "आम्हाला राजकारणात जायचं नाहीय. तुम्ही आम्हाला समजून घ्या. राज्यात जितके राजकीय पक्ष आहेत त्यांनी सर्वांनी सांगायला पाहिजे की, मराठ्यांना ओबीसीतील आरक्षण द्यायला हवं. तुमच्याकडे सत्ता आहे, बहुमत आहे. परंतु मराठ्यांचं वाटोळ करायला हे सरकार आलं असून हे आता मराठ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. 29 ऑगस्टपर्यंत आरक्षण दिलं तर सर्व विषय संपेल. आरक्षण दिलं नाही तर मात्र आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही राजकारणात उतरणार", असे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर करुन टाकलं आहे. त्यानुसार मोर्चेबांधणी करण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. मराठा समाजातील अनेक तरुणांनी आगामी विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या सर्व प्रस्तावांवर २९ ऑगस्टला निर्णय घेतला जाणार आहे. या दिवशी संपूर्ण राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव उपस्थित राहणार आहे. उमेदवारी देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे", असं ते म्हणाले.

जरांगे फॅक्टर जोरात : लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या खासदारांची संख्या 41 वरून 17 वर आली. त्यासाठी विविध कारणं दिली गेली. त्यामध्ये मराठा आरक्षणसुद्धा एक असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलं होतं. मराठा आंदोलनाचं यश म्हणजे महाराष्ट्रमध्ये यंदा प्रथमच 48 खासदारांमध्ये 26 मराठा खासदार निवडून आले आहेत. ही टक्केवारी एकूण खासदारांच्या 60 % आहे. अशाच प्रकारे येत्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा मराठा समाजाचे आमदार विक्रमी संख्येनं निवडून येतील, अशी शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा फार चालला. मराठवाड्यात आठ पैकी आठ खासदार मराठा निवडून आले. छत्रपती संभाजीनगरची जागा सोडली, तर इतर सात जागांवर महायुतीचा दारुण पराभव झाला. माजी केंद्रीय राज्यमंत्री, भाजपा नेते, रावसाहेब दानवे यांनासुद्धा मराठा आरक्षणाचा मोठा फटका बसून पराभवाला सामोरं जावं लागल्याचं मान्य केलं आहे. मराठवाड्यासह विदर्भ, मुंबई, कोकण तसंच पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा जरांगे फॅक्टरचा प्रभाव पाडत चालला आहे.

आम्हाला निवडणुकीची भाषा शिकवू नका :या विषयावर बोलताना भाजपा नेते मुंबई अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले, ''मनोज जरांगे पाटील, भारतीय जनता पक्षाला संपवण्याची सुपारी ज्या ज्या लोकांनी घेतली त्याबद्दल तुम्ही थोडा अभ्यास करा. आम्ही समाजाबरोबर आहोत, समाज आमच्या बरोबर आहे. तुमच्या सोबतीला संपूर्ण समाज आहे, या गैरसमजात राहू नका. तुम्ही निवडणुकीची भाषा बोलत असाल तर आम्ही तयार आहोत. अनेक निवडणुकांमध्ये विजय, पराभव पचवले आहेत. आम्हाला तुम्ही निवडणुकीची भाषा शिकवू नका. जोपर्यंत तुम्ही समाजाची भूमिका मांडत आहात, तोपर्यंत तुमचं स्वागत. परंतु जर तुम्ही राजकीय भूमिका मांडली, तर त्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल, असा रोखठोक इशारा आशिष शेलार यांनी जरांगेंना दिला आहे.

ओबीसील समाजाचे १०० आमदार निवडून गेले पाहिजेत : मराठा आरक्षणाबद्दल बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले, "मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा प्रश्न हा राजकीय आहे. तो राजकीयच रहायला पाहिजे. परंतु त्यांचा हा प्रश्न आता सामाजिक झाला असून गावा गावामध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. यामध्ये सामाजिक दरी निर्माण झाली आहे. भविष्यामध्ये ओबीसींना राजकीय आरक्षण वाचवायचं असेल, तर येत्या विधानसभेत ओबीसीचं 100 आमदार निवडून गेले पाहिजेत. यासाठी प्रत्येक ओबीसींनी जागरूक राहण्याची गरज आहे."

'हे' वाचलंत का :

  1. विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांवर बहिष्कार टाका - रामदास आठवले - Ramdas Athawale Vs MNS
  2. अनिल देशमुखांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले.." झूठ बोले..." - Devendra Fadanvis On Anil Deshmukh
  3. अदानी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीबाबत शरद पवारांचे कानावर हात, शिंदे-पवार भेटीवरुन तापलं राजकारण - Sharad Pawar Meets Eknath Shinde

ABOUT THE AUTHOR

...view details