पुणेManoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. "उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मला गुंतवायचं स्वप्न आहे. ते स्वप्न मी पूर्ण होऊ देणार नाही," असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
जरांगे पाटील पुणे न्यायालयात :2013 साली कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये 'नॉन बेलेबल वॉरंट' जरांगे पाटील यांच्या विरोधात जारी केला होता. आज झालेल्या सुनावणी बाबत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, "आज उपोषणामुळे मला प्रचंड त्रास होत आहे. यामुळे आज मी न्यायालयात रुग्णवाहिकेत आलो आहे. मला कायद्याचा, संविधानाचा तसेच न्यायाधीशांचा सन्मान आहे. त्यामुळे मी आज रुग्णवाहिकेतून न्यायालयात हजर राहिलो आहे. मी न्यायालयाचा आदर करतो आणि करत राहणार आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत मी आता काहीच बोलणार नाही."
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून देणारच- पाटील :एकीकडे आपण रुग्णवाहिकेतून उपचार घेत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र दौरा आणि पुढील विधानसभा निवडणुकीबाबत जरांगे पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, "माझ्या तब्येतीला किंमत नसून समाजातील तरुणांना किंमत आहे. मी समाजासाठी रुग्णवाहिकेतून जाणार की, कशातून जाणार? याला महत्त्व नाही. माझा महाराष्ट्र दौरा 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान पूर्ण होणार आहे. माझ्या शरीराची परिस्थिती काहीही असली तरी मी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिल्याशिवाय शांत राहणार नाही. सरकारचा कितीही विरोध असो, मी देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही," असं यावेळी पाटील म्हणाले.