जालना Manoj Jarange Patil : ओबीसींची वाट लावून तुम्हाला दुसरी अधिसूचना काढू देणार नाही या प्रश्नावर, "विजय वडेट्टीवार वारंवार कुत्र चावल्यासारखं बोलतात. त्यांना दुसरं काही काम नाही. कधी मराठ्यांच्या विरोधात बोलायचं तर कधी बाजूनं बोलायचं हे कुत्र चावल्यावर बोलल्यासारखं लक्षण आहे. पण हे समजायला आणि राजकारणातही चांगलं नाही", अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिलीय. "राहुल गांधी सांगतात तेव्हाच वडेट्टीवार बोलतात. परंतु, फक्त एका जातीचं विरोधी पक्ष बनवलं नाही. तुम्ही सर्व समावेशक बाजू घेतली पाहिजे. पण वडेट्टीवार यांनी असं बोलून आपला पक्ष संपवायचा ठरवलंय", असंही जरांगे म्हणाले. मराठ्यांचं वाटोळं होण्यासारखं वडेट्टीवार बोलतात, असंही ते यावेळी म्हणालेत.
विरोधी पक्षनेता सर्वसामान्य जनतेचा असतो : पुन्हा उपोषण कशासाठी? असा प्रश्न उपस्थित केला असता जरांगे म्हणाले, "ते दोघंही (छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार) शेपट नसल्यासारखं बोलतात. स्वत:ची लाज नसली तरी ज्या पदावर आहात त्या पदाची लाज राखा. वडेट्टीवार यांनी वाया गेलेल्या भुजबळांच्या नादी लागू नये, विरोधी पक्षनेता सर्वसामान्य जनतेचा असतो आणि त्यांनी तसं वागावं."
कित्येकांनी स्व:ताची हॉटेल स्व:त जाळली : मराठ्यांची नाराजी पत्कारणं कुणालाच परवडणारं नाही. त्यामुळं कुणी काहीही बोलू नये. ही आमच्या लेकरांच्या हक्काची लढाई आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले. परंतु, काही लोकांना कायमच चुकीच्या कामाचं समर्थन करण्याची सवय आहे. कित्येकांनी स्व:ताची हॉटेल स्वत: जाळली असून त्यांना काही केलं नाही. मात्र, सामान्य लोकांना त्रास दिला जातो, असंही जरांगे यावेळी म्हणाले.
राज्य देवेंद्र फडणवीस चालवतात : येवल्याचं म्हतारं कुणीकडंही बोलतं. परंतु, त्यांच्यावर कोणताच गुन्हा दाखल होत नाही, असं म्हणत जरांगे यांनी नाव न घेता भुजबळांवरच गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सध्या सगळं राज्य देवेंद्र फडणवीस चालवत असून ते यांच्यावर गुन्हे दाखल करत नाहीत, अशी नाराजीही जरांगे यांनी यावेळी बोलून दाखवली.