जालना Maratha Reservation Protest : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी जालना इथं मराठा समाजाची बैठक घेऊन लोकसभा निवडणूक 2024 मध्ये उमेदवार देण्याविषयी निर्णय घेण्याचं जाहीर केलं होतं. मात्र लोकसभा निवडणुकीसाठी गावागावातून उमेदवार उभे न करता त्याऐवजी प्रत्येक जिल्ह्यातून उमेदवार द्यावा आणि मराठा समाजाने त्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असा जरांगे समर्थकांमध्ये मतप्रवाह आहे. त्यामुळे आता उमेदवार देण्याविषयीचा निर्णय 30 तारखेला जाहीर करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी रविवारी झालेल्या बैठकीत जाहीर केलं. त्यामुळे अंतरवाली सराटी इथं झालेल्या बैठकीत कोणताही निर्णय झाली नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे. दुसरीकडं करमाळा तालुक्यातील सभेला आंदोलक न आल्यानं मनोज जरांगे यांनी आयोजकांवर संताप व्यक्त केल्याचं वृत्त प्रसारमाध्यांतून आलं. त्यामुळेच मनोज जरांगेंनी सावध पावलं टाकत निर्णय पुढं लांबवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अंतरवाली सराटीत मराठा समाजाची बैठक :मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीत राज्यातील मराठा समाज बांधवांची एक निर्णय बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी समाजाला बऱ्याच गोष्टीपासून प्रेरित केलं. समाजाची सुद्धा काही मतं पुढील आंदोलनाविषयी जाणून घेतले. यादरम्यान त्यांनी सरकारवर घणाघाती टीका करत "सरकारनं मराठा आरक्षणाचा प्रश्न वेळीच मार्गी लावावा, नसता येणाऱ्या निवडणुकीत हा मुद्दा सरकारसाठी घातक ठरणार आहे. हा मराठा समाज तुमचे पांढरे कपडे उतरल्याशिवाय राहणार नाही," असा इशारा सुद्धा जरांगे पाटील यांनी रविवारी आंतरवाली इथं दिला आहे.
आंदोलनाकडं फिरवली नागरिकांनी पाठ :"करमाळा तालुक्यातील मराठा आंदोलकांनी मनोज जरांगे यांच्या सभेसाठी अगोदर 19 एकर जमीन राखीव ठेवली होती. मात्र आंदोलक येणार नसल्याची चाहूल लागल्यानं आयोजकांनी ती केवळ 5 एकरवर आणली. मात्र तरीही आंदोलकांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाकडं पाठ फिरवल्यानं सभास्थळ रिकामं राहिलं. त्यामुळे मनोज जरांगे आयोजकांवर चांगलेच संतापून त्यांनी तिथून 5 मिनिटात काढता पाय घेतला," अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र या सभेची चांगलीच चर्चा रंगली आहे.