जालना : मनोज जरांगे यांनी 15 फेब्रुवारीपासून राज्यव्यापी साखळी उपोषणाची घोषणा केली. मात्र राज्य सरकारनं शिंदे समितीला मुदतवाढ देऊन ही समिती गॅझेटचा अभ्यास करणार असल्याचा अध्यादेश काढला. त्यामुळे मनोज जरांगे यांनी 15 फेब्रुवारीपासून सुरू केलं जाणारं राज्यव्यापी साखळी उपोषण 15 दिवसांसाठी स्थगित केलंय. या 15 दिवसात म्हणजे फेब्रुवारी अखेरपर्यंत सरकारनं उर्वरीत 2 मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा पुन्हा आंदोलन सुरू करणार, असा ईशारा मनोज जरांगे यांनी दिलाय. यावेळी त्यांनी संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात सरकारवर गंभीर आरोप केले.
सरकार संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना सोडून देणार :उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठोस पुरावे मिळत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई न करण्याची भूमिका घेतलीय. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना सरकार सोडून देणार असल्याचा खळबळजनक दावा मनोज जरांगे यांनी केलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड करण्यात सरकारचा सहभाग आहे का? असा सवाल देखील त्यांनी केलाय. महादेव मुंडे यांच्या पत्नीनं आंदोलन करण्याचा ईशारा दिलाय. यावर बोलताना "धनंजय मुंडेंची भावजय असताना त्यांच्यावर अशी वेळ येऊ नये. ही धनंजय मुंडेंसाठी शरमेची बाब आहे. मात्र गरज पडली तर मी महादेव मुंडेंच्या पत्नीच्या पाठीशी उभं राहणार," असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं.